Thackeray Group Vs BJP: राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत अजित पवार सत्तेत सहभागी झाले. यानंतर लगेचच शरद पवार यांनी राज्यभर दौरे करणार असल्याचे जाहीर केले. आता उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळाली असून, यावरून भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीमुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावरून भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात येत आहे. भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली.
मजबुरी आहे, म्हणून उद्धव ठाकरे दौऱ्यावर
मजबुरी आहे, म्हणून उद्धव ठाकरे दौऱ्यावर जात आहेत. काय करतील ते? कोरोनामध्ये दौरा केला असता तर कदाचित एकनाथ शिंदे आमच्याकडे आलेच नसते. तेव्हा काहीच केले नाही, घरी बसले म्हणून आता दौरे करावे लागताहेत. शेवटी कधी ना कधी कष्ट करावे लागतील. एकतर अगोदर अभ्यास करा मग बाकी जीवन सुखाचे. नाहीतर अभ्यास नाही केला तर बाकी जीवन कष्टाचे, असे सूत्र असते. हे आमच्या शिक्षकांनी अभ्यास करताना सांगितले होते. ते त्यांच्या शिक्षकांनी सांगितले नसावे, असा खोचक टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कधीही विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही; आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय. उद्धव ठाकरे आता तुम्ही कितीही दौरे केले तरी तुमचे ढोंगी राजकारण आणि सत्ता गेल्यामुळे सुरू असलेली नौटंकी जनता ओळखून आहे, या शब्दांत बावनकुळे यांनी हल्लाबोल केला.