Sudhir Mungantiwar trolls Uddhav Thackeray: राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून बरीच उलथापालथ पाहायला मिळाली आहे. २०१९ ला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर २०२२ च्या जून महिन्यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना सोबत घेत बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी कटूता निर्माण झाली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेतच, पण राजकीय शेरेबाजी आणि टोलेबाजीला उधाण आले आहे. अशातच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघ आणि राजकारण यासंबंधी नाव न घेता टोला लगावला.
"सध्या राज्यातील वाघांचे स्थानांतरण करण्यास आम्ही सुरूवात केली आहे. साधारणपणे ताडोबामध्ये आणि बफर झोन मध्ये वाघ आहे, ते वाघ आम्ही नवेगाव नागझिराच्या जंगलात देत आहोत. वाघ कुठलाही असो... तो ताडोबातील असो, जिल्ह्यातील असो किंवा राजकारणातील वाघ असो. त्या वाघाचे स्थानांतरण योग्य ठिकाणी करण्याची आमची जबाबदारी आहे आणि ते आम्ही करतो," असे उत्तर सुधीर मुनगंटीवारांनी दिले. त्यावरच पत्रकारांनी संधी साधून वाघाच्या विषयी राजकारणाशी संबंधित प्रश्न केला.
पत्रकाराने विचारले की, शिवसेनेच्या वाघाचे स्थानांतरण योग्य ठिकाणी झाले का? त्यावर मुनगंटीवार म्हणाले- 'त्यांच्या ४० वाघांचे स्थानांतरण योग्य ठिकाणी झाले आणि तेच त्यांच्यासाठी पोषक असते." त्यावर पत्रकारांनी जखमी वाघांबद्दलच्या योजनांबद्दल विचारले. त्यावेळी मुनगंटीवार म्हणाले- "जखमी वाघांसाठी आम्ही रेस्क्यू सेंटर (मदत केंद्र) उभारतो आहे. तेथे जखमी वाघांचा योग्य इलाज उपचार केला जाईल." यालाच जोडून पत्रकारांनी असाही प्रश्न विचारला की, तुम्ही शिवसेनेच्या जखमी वाघाबद्दल बोलत आहात का? त्यावर मुनगंटीवार म्हणाले- "वाघ कुठलाही असो तो जर जखमी असेल तर त्याचा इलाज करावाच लागतो." या संपूर्ण संभाषणातून मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाला चांगलेच टोले लगावले.