शिर्डी : भारतीय जनता पक्षाच्या सर्व मंत्र्यांना आता महिन्यातून किमान एकदा एका खेड्यात जाऊन मुक्काम करावा लागणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या तसेच जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत ही माहिती दिली.
भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या बैठकीत प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, विविध आघाड्यांचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे तसेच केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यावेळी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, की खेड्यातील माणसांच्या समस्या समजून घ्यायच्या असतील तर पक्षाच्या मंत्र्यांना खेड्यात जावेच लागेल. तेथे मुक्काम करावा लागेल, लोकांशी संवाद साधावा लागेल. भाजपच्या प्रत्येक मंत्र्यांच्या कार्यालयात एक ओएसडी असा असेल, की जो फक्त पक्ष संघटनेशी संबंधित कामांकडे आवर्जून लक्ष देईल.
मंत्र्यांना त्याविषयी अवगत करील आणि मंत्री पक्षजणांची कामे लवकरात लवकर होतील याकडे जातीने लक्ष देतील. पक्षाचा कार्यकर्ता आणि पक्षाचे पदाधिकारी हा आपला कणा आहे. त्याने सामान्य माणसाशी |संबंधित आणलेली महत्त्वाची कामे झालीच पाहिजेत, याकडे मंत्री विशेष लक्ष देतील, असे बावनकुळे म्हणाले.
सदस्य नोंदणीचे लक्ष्य पूर्ण कराप्रदेश भाजपने दीड कोटी सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष निश्चित केले आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ४५ लाख सदस्य झाले आहेत, याबद्दल बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली आणि आपला स्कोअर २० जानेवारीपर्यंत सुधारा, असे सगळ्यांना सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशाचे श्रेय पक्ष संघटनेला आहे. त्यासाठी सर्वांनी अहोरात्र मेहनत केली. थोडा शीण आला असेल; त्यामुळे त्याचा परिणाम सदस्य नोंदणीवर झाला तरी आता येत्या आठ-पंधरा दिवसांत टार्गेट पूर्ण होईल, याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे.