मुंबई: भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे(Eknath Khade) यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचालनालयाने(ED) अटक केली आहे. त्यानंतर आता खडसे आणि त्यांच्या कन्येची ईडीकडून चौकशी सुरू आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी भाजपवर जोरदार टीका केलीये. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने भाजपवाले चिडले आणि त्यामुळेच केंद्रीय यंत्रणांचा खडसेंविरोधात गैरवापर सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी(Bhosari land scam) अडचणीत सापडलेले एकनाथ खडसे यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. त्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. खडसेंनी सन्मानाने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळेच त्यांच्याविरोधात हे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला. तसेच, खडसेंविरोधात कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. जागा त्यांनी रितसर घेतली आणि त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, प्रकृती ठीक नसतनाही आज सकाळी खडसे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ही राजकीय हेतूने प्रेरित कारवाई असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आपण ईडीला सहकार्य करणार असून त्यांना हवी असलेली माहिती मी देणार आहे. परंतू मला यात राजकीय वास येत आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा भूखंड खासगी आहे. एमआयडीसीने सांगावे की तो भूखंड आपला आहे, जमीन मालकाला मोबदला दिला आहे, असे सांगितल्यास मी दोषीच असेन. मी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माझी चौकशी सुरु झाली. हे कार्यकर्त्यांनाही माहिती आहे. यामुळे यात राजकीय हेतू असल्याचे खडसे म्हणाले.
खडसेंच्या जावयांचीही चौकशी
भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी (Bhosari land scam) खडसे यांना युतीच्या सरकार काळात महसूलमंत्री पदही गमवावे लागले होते. यानंतर खडसेंना देखील ईडीने चौकशीला बोलावले होते. या चौकशीला खडसे सामोरे गेले होते. खडसे यांची मुलगी शारदा यांनादेखील ईडीने चौकशीला बोलावले होते. त्यानंतर त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. मंगळवारी दिवसभर गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात आली.