शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. आज त्यांची कोठडी संपत आहे. मात्र यातच, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये काल, म्हणजेच रविवारी राऊतांच्या नावाने 'रोख-ठोक' सदर प्रसिद्ध झाले. यामुळे आता राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहेत. मग, त्यांच्या नावाने सामनामध्ये लेख कसा छापून आला? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना जोरदार टोला लगावला आहे. भ्रष्टाचार कसा बुडाशी येतो, असा एखादा लेख लिहा म्हणावं, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.
नेमके काय म्हणाले भातखळकर? -ईडीच्या फेऱ्यात अडकलेल्या संजय राऊतांना टोला लगावताना भातखळकर यांनी, "शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आगाऊपणामुळे पक्ष संपला, पण यांचा आगाऊपणा मात्र संपत नाही. ED च्या कोठडीतून रोखठोक लिहिलंय. भ्रष्टाचार कसा बुडाशी येतो, असा एखादा लेख लिहा म्हणावं...," असे ट्विट केले आहे.
ईडी करणार चौकशी -महत्वाचे म्हणजे, संजय राऊत हे कोठडीत असताना लेख किंवा कॉलम लिहू शकत नाहीत. न्यायालयाने त्यांना विशेष परवानगी दिली तरच ते लिहू शकतात. त्यांनी न्यायालयाकडे, अशी कुठलीही परवानगी मागितलेली नाही अथवा न्यायालयानेही त्यांनी तशी परवानगी दिलेली नाही. यामुळे राऊतांनी तुरुंगात असताना लेख लिहिला का? जर लिहिला असेल, तर तो बाहेर गेलाच कसा? याची चौकशीही ईडी करणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
काय आहे रोख-ठोकमध्ये -गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढले, तर मुंबईत एकही पैसा शिल्लक राहणार नाही आणि ती भारताची आर्थिक राजधानीही राहणार नाही, अशा राज्यपालांच्या वक्तव्यावर या लेखात टीका करण्यात आली आहे. राऊता अटक झाल्यानंतर साधारणपणे दुसऱ्या दिवशी कोश्यारी यांनी हे वक्तव्य केले होते.