मुंबई : क्रूझ ड्रग्स पार्टी अथवा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक हे सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन आणि सोशल मीडियाच्या माध्यमाने नवनवे आरोप किंवा खुलासे करत आहेत. मलिक यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही काही गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचे कौतुक केल्याचे बोलले जात आहे. यावरूनच आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. (Atul Bhatkhalkar on Uddhav Thackeray and Nawab Malik)
काय म्हणाले भातखळकर? -यासंदर्भात, आमदार भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे, की 'गुड गोइंग! नवाब मलिक यांच्या लढ्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदेत बेछूट आरोप करणारे नवाब मलिक केवळ व्यवसायाने नाहीत तर मनोवृत्तीने देखील भंगारवाले आहेत. अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतायत.'
‘गुड गोईंग’ म्हणत मुख्यमंत्र्यांची मलिकांना कौतुकाची थाप -मंत्री नवाब मलिक यांनी ज्यांना सध्या घेरले आहे, त्यांची चांगलीच पळापळ होत आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कुठल्याही नेत्याचे नाव न घेता लगावला होता. एवढेच नाही, तर ‘गुड गोईंग’ अशा शब्दात त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत नवाब मलिक यांचे कौतुक केल्याची माहिती समोर आली होती.
...अन्यथा अब्रुनुकसानीच्या कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहा - अमृता फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यातच, देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांच्या जावयाच्या घरात अंमली पदार्थ सापडले असे म्हटले होते. याविरोधात मलिकांची कंन्या निलोफर यांनी फडणवीस यांना जाहीर नोटीस पाठवली होती. यानंतर, आता नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या काही फोटोंवर आक्षेप घेत अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना अब्रुनुकसानीची नोटिस पाठवली आहे. तसेच या प्रकरणी जाहीर माफी मागावी आणि 48 तासांच्या आत हे ट्विट डिलिट करावे, अन्यथा अब्रुनुकसानीच्या कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहावे, असा इशारा अमृता फडणवीस यांनी दिला आहे.