ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 19 - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे गडचिरोलीचे भाजप आमदार डॉ.देवराव होळी यांना मोठा हादरा बसला आहे. लाभाचे पद भूषवित असतानाही निवडणूक लढली असल्याचे सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने त्यांना अपात्र घोषित केले आहे. शिवाय २०१४ साली घेण्यात आलेली निवडणूक रद्द ठरविण्यात आल्याचा निकाल गुरुवारी आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून उभे राहिलेले नारायण जांभुळे यांनी आमदार होळी यांच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर विशेष न्यायपीठाचे न्यायमूर्ती झेड.ए. हक यांनी हा निकाल दिला. ही याचिका २०१४ पासून प्रलंबित होती.
वैद्यकीय अधिकारी असताना डॉ.होळी यांनी सिकलसेल आजाराच्या नियंत्रणासाठी शकुंतला मोमोरियल संस्था उघडली होती. २००८-०९ या कालावधीत संस्थेचे अध्यक्ष म्हणून हा प्रकल्प राबविण्यात आला होता. जिल्हा परिषदेकडून एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत ३२ लाख ८२ हजार रुपये वितरीत करण्यात आले होते. डॉ. होळी यांनी आपल्या संस्थेत ५० कर्मचारी असल्याचे खोटे दस्तावेज सादर करुन ८ लाख ६८ हजार ३६३ रुपयांची उचल केली. होळी या संस्थेचे अध्यक्ष असून त्यांचे काही नातेवाईक अन्य पदांवर कार्यरत आहेत. १६ जानेवारी २०१३ रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंश यांच्या तक्रारीवरून चामोर्शी पोलिसांनी होळी व इतर आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०९, ४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला होता. होळी यांची ९ फेब्रुवारी २००२ रोजी वैद्यकीय अधिकारी (वर्ग-२, गट-अ) पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी १९ आॅगस्ट २०१३ रोजी राजीनामा दिला होता. परंतु, १४ आॅक्टोबर २०१३ रोजी त्यांचा राजीनामा फेटाळण्यात आला होता. असे असतानाही त्यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी अगोदर डॉ.होळी त्यांच्या अर्जावर आक्षेप घेतला व त्यानंतर अर्ज दाखल करुन घेण्यात आला. निवडणूक जिंकल्यानंतर डॉ.होळी यांनी राजीनामा नामंजुरीला आव्हान देत महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण नागपूर येथे याचिका दाखल केली. तेव्हा प्राधिकरणाने होळी यांची याचिका खारीज केली. या सर्व बाबी लक्षात घेता होळी हे विधानसभा निवडणूक लढविण्यास अपात्र होते असा दावा करत जांभुळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाने दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकून घेत व साक्षीपुरावे तपासल्यानंतर हा निकाल दिला. जांभुळे यांच्यातर्फे अॅड. प्रदीप वाठोरे, तर होळींतर्फे अॅड. गणेश खानझोडे यांनी बाजू मांडली.