मुंबई: ड्रग्ज पार्टी प्रकरणातील अटक झालेल्या आर्यन खानच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळ देतात, तातडीनं बैठक घेतात. मात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून पडळकरांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे.
आर्यन खानची सुटका व्हावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत बैठका घेतात. पण मराठी एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांना चर्चा करायलाही वेळ नाही. आतापर्यंत ३१ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पण हे प्रस्थापितांचं सरकार झोपेचं सोंग घेतंय आणि कोर्टाची दिशाभूल करतंय. जर यांनी वेळेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली असती तर ३१ जणांचे प्राण वाचले असते आणि महाराष्ट्रातील जनतेची गैरसोय टळली असती, अशा शब्दांत पडळकरांनी सरकारवर तोफ डागली.
आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या एसटी कामगारांच्या पाठिशी खंबीरपणे पाठीशी आहोत. जराही नैतिकता शिल्लक असेल तर ३१ जणांनी केलेल्या आत्महत्येची जबाबदारी स्वीकारून अनिल परब राजीनामा देणार का?, असा सवाल पडळकरांनी उपस्थित केला. आपली जबाबदारी न्यायालयावर ढकलून स्वतः नामानिराळे राहायचे हाच त्यांचा डाव आहे. पण त्या ३१ कर्मचाऱ्यांच्या आत्म्याचा तळतळाट तुम्हाला सुखानं जगू देणार नाही, हे लक्षात ठेवा, अशी टीका पडळकर यांनी केली.