सांगली - आदित्य ठाकरेंचा झंझावाती दौरा म्हणता येणार नाही. त्यात काँग्रेसवाले थोडे, राष्ट्रवादीवाले थोडे आणि शिवसेनेचे काही थोडे अशी माणसं येत आहेत. न्यूज चॅनेलच्या सर्व्हेत आता निवडणुका झाल्या तर शिवसेनेचे २-३ खासदार आणि १७-१८ आमदार निवडून येतील दाखवले. मग झंझावात असता तर पोलमध्ये काहीतरी यायला पाहिजे होते. परंतु आता म्हसोबाला नाही बायको अन् सटवाईला नाही नवरा अशी अवस्था या तिन्ही पक्षाची झालीय असा टोला भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेला लगावला आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, सध्या तिघेही एकमेकांना एडजेस्ट करून घेत आहेत. राज्यात जो दौरा सुरू आहे त्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अग्रेसर आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गळ्यात भगवा मफलर टाकून शिवसेनेच्या नावानं घोषणा करतायेत. आमच्यावर किती हल्ले झाले त्याचे साक्षीदार तुम्ही आहात. आमच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी वेगळ्याप्रकारे मांडणी करत होते. शिवसैनिक पुण्यात इतके नाही. बरेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. ज्या ज्या ठिकाणी सभा होतेय तिथे शरद पवारांची माणसं उपस्थित असतात असा आरोप पडळकरांनी केला. आटपाडी येथे खासगी सावकारीविरोधात काढलेल्या मोर्चानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नेमकं काय घडलं?शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी पुण्यात कात्रज चौकात हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या गाडीची काच देखील फोडण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी आता याप्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, सुरज लोखंडे, संभाजीराव थोरवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मध्यरात्री पुणे पोलीस आयुक्तांना या प्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. तर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी हिंगोलीतील शिवसेना पदाधिकारी बबन थोरात यांना देखील मुंबईतून ताब्यात घेतले आहे.