मुंबई – जालना येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मराठा आंदोलनाचा मुद्दा पुन्हा पेटला होता. १५ दिवसांच्या या आंदोलनामुळे मराठा आरक्षण चांगलेच चर्चेत आले. आता हे उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आणखी एक आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. राज्यात धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणे उपोषण आंदोलन सुरू केले आहे. त्यात आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले आहे.
या पत्रात आमदार गोपीचंद पडळकर म्हणतात की, आमचे प्रश्न संवादाने सुटतील ही अपेक्षा आहे, पण दिरंगाईमुळे आमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. याची दक्षता घेऊन धनगर आरक्षणाची बैठक घ्यावी अन्यथा महाराष्ट्रातसुद्धा जाठ आंदोलनासारखे धनगर आंदोलन उभा होईल हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय असा इशारा त्यांनी दिला आहे.
गोपीचंद पडळकर यांच्या पत्रात ७ मुद्दे
१) अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने धनगर आरक्षणाकरिता उच्च न्यायालयात दाखल याचिकेत (याचिका क्र. ४९१९/२०१७) अॅड. कुंभकोणी यांची कायम नियुक्ती करणे तसेच न्यायालयात तात्काळ व दैनंदिन सुनावणी करता सरकारतर्फे अर्ज दाखल करणे.
२)मेंढपाळांसाठी घोषित केलेल्या दहा हजार कोटींच्या सहकारी महामंडळाचे जिल्हास्तरीय स्थापन झाल्या असून लवकरात लवकर सहकार महामंडळाची घोषणा करून योजना कार्यान्वित करण्यात यावी व तसेच स्वतंत्र अध्यक्षाची नेमणुक करणे.
३) ‘जे आदिवासींना ते धनगरांना’ याप्रमाणे घोषित केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या २२ योजनांपैकी काही योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या नाहीत व संपूर्ण निधी सुद्धा उपलब्ध झाला नाही त्याबाबत आढावा घेऊन उपायोजना करणे.
४) मेंढपाळांवर होत असलेले हल्ले रोखणे व त्यावर ‘स्वतंत्र कायदा‘ आणून त्यांना संरक्षण देणे, तसेच महसूल रेकॉर्ड मधील आरक्षित चराई कुरणे क्षेत्र वार्षिकी प्रति हेक्टर एक रूपया दर आकारणी करून स्थानिक मेंढपाळांना वाटप करणे.
५) आरेवाडीच्या बिरोबा मंदिर देवस्थानाच्या सर्वांगिण विकासासाठी व भाविकांच्या सोयीसुविंधासाठी आणि सुशोभिकरणासाठी २०० कोटी रूपयांचा निधी द्यावा.
६)महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेले किल्ले वाफगावच्या विकास संवर्धनासाठी सरकारने किल्ला ताब्यात घेऊन ‘किल्ले वाफगाव विकास आराखडा‘ त्वरित तयार करून त्याला मान्यता द्यावी.
७) ज्या पद्धतीने औरंगबादाचे नामांतर छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे तात्काळ व ठोस पाऊले उचलण्यात आली त्याच पद्धतीने अहमदनगर जिल्ह्याच्या ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ नामांतरासाठी प्रयत्न व अंमलबजावणीसाठी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश द्यावे.
दरम्यान, आम्ही सर्व धनगर आरक्षणाचा प्रश्न कायद्याने व संसदीयमार्गाने मार्गी लावण्यास प्रयत्नशील आहोत परंतु होणारी दिरंगाई व सतत अवहेलना यामुळे आमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. याबाबतची काळजी व दक्षता घेऊन वरील मुद्यांबाबतची बैठक त्वरित आयोजित करावी अशी मागणी करत अन्यथा महाराष्ट्रात सुद्धा जाठ आंदोलनासारखे ‘धनगर आंदोलन’ उभा राहू शकते असा इशारा आमदार गोपीचंद पडळकरांनी दिला आहे.