सातारा – एखाद्या जबाबदार व्यक्तीने जाहीर व्यासपीठावरुन बोलताना किती भान सांभाळून बोललं पाहिजे याची चर्चा सध्या राज्यभरात सुरु आहे. अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला हा अमृत महोत्सव की हिरक महोत्सव असं विधान केले. ते सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर नारायण राणेंनी त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. आता भाजपा आमदार जयकुमार गोरे यांचीही अशीच एक व्हिडीओ क्लीप व्हायरल होत आहे.
सातारच्या माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी प्रभू रामचंद्राबाबत केलेल्या विधानावरुन गोत्यात अडकले आहेत. जयकुमार गोरे यांनी केलेल्या विधानामुळे भाजपाची गोची झाली आणि शिवसेनेला चांगलाच मुद्दा सापडला आहे. वडूजच्या सातेवाडी येथील कार्यक्रमात जयकुमार गोरे म्हणाले की, रामायणात लढाईत रामाने रावणाला हरवले. रावण अखेरच्या घटका मोजत होता. तेव्हा रावणाने रामाला विचारले, माझ्याकडे एवढी सेना आहे. एवढी ताकद आहे. एवढे राक्षस आहेत. तुझ्याकडे तर फक्त वानरे आहेत. तरीही तू जिंकलास कसा? त्यावर राम म्हणाला, माझ्याकडे तुझा भाऊ बिभीषण होता. म्हणून लढाई जिंकलो.
यानंतर आमदार गोरे म्हणाले, माझ्याकडे तर भाऊ नसतानाही मी जिंकलो आहे. कारण रामाची नियत खराब होती असं विधान त्यांनी दोनदा म्हटलं. त्यावर उपस्थितांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर रामाची नव्हे रावणाची नियत खराब होती अशी दुरुस्ती केली. जयकुमार गोरे यांनी अनावधानाने ही चूक केली असली तरी सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड गाजत आहे. अनेकजण या विधानाची खिल्ली उडवत आहेत.
शिवसेनेने पाठवली रामायण ग्रंथाची प्रत
भगवान प्रभू रामचंद्रांचा भर सभेत अपमान करणारे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा शिवसेना पक्षाने जाहीर निषेध केला असून भाजपच्या सर्व आमदारांना रामायण ग्रथांचे पठण करण्याची गरज असल्याचे मत शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले आहे. रामायण - महाभारत हे हिंदूंचे पवित्र ग्रंथ असून त्याची कोणतीही बदनामी आम्ही सहन करणार नाही असा इशाराही डॉ मनीषा कायंदे यांनी दिला आहे.
प्रभू रामचंद्रांचा अनादर म्हणजेच भारतीय संस्कृतीचा अपमान आहे, जर तुम्हाला रामायण अथवा महाभारतातील संदर्भ माहीत नसतील तर ते ग्रंथ वाचण्याची खूप गरज आहे. ऐकिव माहितीवर आपले चुकीचे ज्ञान देऊन महापुरुषांचा अपमान करू नये. " मी असतो तर " ब्रँडेड कोकणचे खासदार आता गोरे यांच्या श्रीमुखात लावणार का ? असा सवालही डॉ मनीषा कायंदे यांनी केला आहे. प्रभू श्रीराम -रावण बिभीषण हे रामायणात होते का महाभारतात हे माहित नसलेले भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना मनीषा कायंदे यांनी पोस्टाद्वारे रामायण ग्रंथाची एक प्रत पाठविली आहे.