नवी दिल्ली: शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यती(Bullock cart race)बाबत आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
चार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. पण, आता ही बंदी उठवण्यात आली आहे. बैलगाडा शर्यती आयोजित करताना नियमांचे पालन करावे आणि नियमांच्या चौकटीत राहून शर्यतीचे आयोजन करावे लागेल. पशू क्रूरता प्रतिबंधक कायद्यातंर्गत नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.
महेश लांडगेंनी थोपटला दंडदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर भाजप आमदार महेश लांडगे (Mahsh Landge) खूप खूश दिसले. बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालय सुनावणी असल्याने भाजपाचे आमदार महेश लांडगे दोन दिवसांपासूनच दिल्लीत तळ ठोकला आहे. आजच्या निर्णयानंतर लांडगे यांनी सर्वोच्च न्यायालयातच दंड थोपटून आनंद व्यक्त केला. आता अनेक वर्षानंतर राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे.
शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली- अजित पवारराज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वागत केले असून हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा आणि पशुधनाचे संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल, असं ते म्हणाले. या निर्णयाने बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे. हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
या निर्णयामुळे आनंद वाटतोय- दिलीप वळसे पाटीलबैलगाडा शर्यतीवर घालण्यात आलेली बंदी न्यायालयाने उठवल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी समाधान व्यक्त केले. बैलगाडा शर्यतीवर असलेल्या बंदीमुळे शेतकरी नाराज झाले होते. त्यामुळे ही बंदी उठवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. अखेर आज बैलगाडा शर्यतीला परवानी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे निश्चितच सर्वांना आनंद झाला आहे, असं वळसे पाटील म्हणाले.