मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राजकारणात आंबा पडल्यासारखे अचानक मोठे झाले आहेत. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट काय होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. त्यामुळे टीका करताना विचार करा, पायदळी यायला वेळ लागणार नाही, अशी टीका माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर यांच्यावर बोचरी टीका केली आहे. "राजेश क्षीरसागर सारख्या भुंकणाऱ्यांना माहीत आहे.. राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही...राज्यपाल नियुक्त आमदारकीचे बिस्कीट आमच नाव घेतले की मिळेल असा गैरसमज झाला असेल.. पण रामदास कदम सारख्यांचे भुंकून किती दात उरले आणि काय अवस्था मातोश्रीने केली हे ही लक्षात ठेवावे!", असे ट्विट नितेश राणेंनी केले आहे.
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील सीपीआरमध्ये बेड्स आणि कपाटांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्या टीकेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री ठाकरे हे संयमी नेतृत्व आहे. राज्यभर उगाच दिंडोरा पिटवून राज्यकारभार होत नाही. चंद्रकांत पाटलांना युतीचा इतिहास माहीत नसेल. गेल्या तीस वर्षांपासून भाजप आणि शिवसेना यांची युती होती. या कालावधीत 'मातोश्री'वरील नेत्यांनी कधीही माध्यमातून प्रतिक्रिया न देता केवळ आपल्या मुखपत्रातून मत व्यक्त केले. 'मातोश्री'वर टीका करणाऱ्यांचा शेवट काय होतो हे नारायण राणे यांनी अनुभवलं आहे. त्यामुळे टीका करताना विचार करून करावी, असा सल्लाही राजेश क्षीरसागर यांनी दिला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत सरकार पाडून दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेत्यांना केले होते. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांच्या या आव्हानाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'तुम्ही इतर वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन दाखवा' असा पलटवार केला. तसेच, 'चार महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली आहे. त्यामुळे मॅच फिक्सिंग हे इथे आलेच. कोरोनाच्या परिस्थितीनंतर उद्धव ठाकरे हे माध्यमांसमोर आले आहेत. मुळात संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतीपाठक आहे. त्यामुळे हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्यावी', असे थेट आव्हानच चंद्रकात पाटील यांनी दिले होते.
आणखी बातम्या...
कोरोनापासून बचावासाठी डॉक्टरचा 'देसी जुगाड'; रुग्णांवर असा केला जातोय उपचार
अयोध्येतील राम मंदिरासाठी ५ कोटींची देणगी, प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापूंची घोषणा
राफेलच्या स्वागतासाठी अंबाला हवाईतळावर जय्यत तयारी, ३ किमीचा परिसर ड्रोन झोन घोषित
पब्जीसह २७५ चिनी अॅप्सवर बंदी? सरकार चीनला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत
'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!