Maharashtra Winter Session 2022: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा चौथा दिवस दिशा सालियान, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून चांगलाच गाजला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा नव्याने तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची घोषणा केली. मात्र, यावरून भाजप नेते आणि आमदार नितशे राणे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबत भाष्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी, आपण राहुल शेवाळे यांना काडीची किंमत देत नसल्याची टीका केली होती. यावरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे. हा विषय ज्यांनी लोकसभेत बाहेर काढला, ते खासदार राहुल शेवाळे नेमके कोण आहेत? ते मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये होते. यांचे लाडके होते. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून वर्षानुवर्ष काम केले आहे. स्थायी समिती असताना, खासदार असताना तुमच्या घराकडे पेट्या पोहोचवायचे, तेव्हा राहुल शेवाळेंना किती किंमत होती ते सांगा, अशी विचारणा नितेश राणे यांनी केली.
आदित्य ठाकरेंवरच वारंवार आरोप का होत आहेत?
सुशांतसिंह राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरेंचेच नाव वारंवार घेतले जाते, दुसऱ्या राजकारण्याचा उल्लेख का केला जात नाही? एकाच माणसाचे सातत्याने नाव घेतले जाते. सुशांतसिंग राजपूत, दिशा सालियान, रिया चक्रवर्ती या प्रकरणात एकाच व्यक्तीचे नाव का येते? मी, नारायण राणे, अमित साटम, अतुल भातखळकर आम्ही सगळे तसेच सुशांतसिंगचे फॅन्सही वारंवार सांगत होते की, या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हायला पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, श्रद्धा वालकर केसमध्ये आफताबची नार्को टेस्ट झाली. तशी आदित्य ठाकरेंची करा. म्हणजे सत्य बाहेर येईल. ए फॉर आफताब, ए फॉर आदित्य… सगळ्या विकृतींचे नाव समान झालेले दिसतेय, अशी गंभीर टीका नितेश राणे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"