Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचा वाद अद्यापही शमताना दिसत नाही. यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हटले आहे. तसेच नितेश राणेंच्या टीकेवरुन अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी, अजित पवारांनी नितेश राणेंची खिल्ली उडवली होती. आता नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार पलटवार केला असून, गुगलवर धरणवीर सर्च केले तर नाव अजित पवारच येणार, अशी टीका केली आहे.
नितेश राणे यांनी केलेल्या टीकेबाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता, टिल्ल्या लोकांच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही, त्याची उंची किती तो बोलतो किती? अशी विचारणा करत, मी असल्यांच्या टीकेला उत्तर देत नाही, त्यांना माझे प्रवक्तेच उत्तर देतील, असे अजित पवार म्हणाले होते. यावर आता नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवारांची चिडचिड बघितली. त्यामुळे आमची टीका योग्य ठिकाणी झाली आहे. आम्ही सोडलेला बाण योग्य जागीच लागला आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
गुगलवर धरणवीर सर्च केले तर नाव अजित पवारच येणार
पुढे नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीत तुम्हाला कसा घाम फोडला हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. अजित पवारांचे सर्वेसर्वा रायगडमध्ये जाऊन नतमस्तक होताना दिसणार नाहीत. ज्यांनी वंशजांचे पुरावे मागितले त्यांना मांडीवर घेऊन फिरणारे हे आहेत. खालच्या पातळीवरची टीका करू शकतो. पण तसे संस्कार माझ्यावर नाहीत. धरणवीर ही पदवी कोणाला दिली जावी असे विचारताच एकच नाव येणार ते म्हणजे अजित पवार, या शब्दांत नितेश राणे यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना औरंग्यावरची टिका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही, असे ट्विटही नितेश राणे यांनी केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"