मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या विधानाचा समाचार घेताना भाजपावर टीका केली. राहुल गांधींच्या वक्तव्याचे आम्हाला समर्थन करता आले असते मात्र आम्ही तसे केले नाही. आम्ही राहुल गांधींचा बचाव केलेला नाही. हाच आमच्यात आणि भाजपात फरक आहे असं राऊतांनी सुनावलं होतं.
त्यानंतर संजय राऊतांच्या ट्विटचा आधार घेत भाजपा आमदार नितेश राणेंनी राऊतांवर पलटवार केला. नितेश राणे यांनी संजय राऊतांच्या ट्विटवरच उत्तर देत म्हटलं की, आता भोंग्यातून यांचं खरं प्रेम बाहेर पडलंय. सावरकरांवरती टीका करणाऱ्यांवर यांची खरी निष्ठा आहे. अशा ढोंगी हिंदूप्रवृत्तीचा मी निषेध करतो असं म्हणत राणेंनी प्रत्युत्तर दिले.
काय होतं संजय राऊतांचं ट्विट?भारत जोडो यात्रेत व्यस्त असुनही राहुल गांधी यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती असं राहुल गांधी म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात ११० दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय असं सांगत संजय राऊतांनी भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती.
राहुल गांधींच्या विधानावरून मविआत मतभेदराहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानामुळे मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. यातच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे म्हटले होते. तर, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्याचे काहीच कारण नव्हते. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असे नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. राहुल गांधी यांनी अशा प्रकारचे विधान करण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते हे लक्षात घ्या असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. त्यानंतर काँग्रेसनेही मविआ बनवताना कुठल्याही पक्षाला त्यांचे विचार सोडा अशी अट घालण्यात आली नव्हती. त्यामुळे काँग्रेसनं, राहुल गांधींनी काय बोलावं याची लक्ष्मणरेषा ते आखू शकत नाही असं म्हणत ठाकरेंना प्रत्युत्तर दिले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"