मुंबई – देशात उत्तर प्रदेश, गोव्यासह ५ राज्यांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहे. या निकालात ५ पैकी ४ राज्यात भारतीय जनता पार्टीनं पुन्हा सत्ता मिळवली आहे. त्यामुळे भाजपा नेते सध्या विजयाचा जल्लोष करत आहे. त्यातच यूपी, गोवा आणि मणिपूरमध्ये झालेल्या शिवसेना उमेदवारांच्या पराभवावरून भाजपानं शिवसेनेला डिवचलं आहे. ५ राज्यांच्या निकालानं शिवसेनेला खरी लायकी कळली अशी घणाघाती टीका भाजपा आमदार नितेश राणेंनी(BJP Nitesh Rane) केली आहे.
आमदार नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेनेचे मोदींचा फोटो लावून ५६ आमदार, १८ खासदार निवडून आले आहेत. मोदींचा फोटो काढला तर त्यांची खरी लायकी काय हे ५ राज्याच्या निकालात दिसलं आहे. महाविकास आघाडी सरकारला आणि शिवसेनेला(Shivsena) ताकद आजमावायची असेल तर सरकारमधून बाहेर पडा, राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा. तेव्हा तुम्हाला कळेल गोवा, उत्तर प्रदेशपेक्षा वाईट अवस्था महाराष्ट्रात होईल असा टोला नितेश राणेंनी शिवसेनेला लावला आहे.
देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी सरकारचा बाप
प्रत्येक भाजपा नेत्याला, कार्यकर्ता जो सरकारविरोधात बोलतो त्याला अडकवलं जात आहे. पोलिसांचा वापर करून विरोधकांना गोवण्यात येत आहे. संतोष परब प्रकरणी दीड महिना तमाशा पाहिला असेल. चुकीच्या पद्धतीने पोलिसांवर दबाव आणला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तेच चाललं आहे. महाविकास आघाडी स्वत:ची कबर खोदत आहे. देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडी सरकारचे बाप आहेत. विरोधी पक्षनेत्याला माहिती शोधण्याचा अधिकार असतो. तुम्ही सुरूवात केली मात्र त्याचा शेवट भाजपा करणार आहे असा इशाराही नितेश राणेंनी दिला आहे.
नोटीस मिळणं म्हणजे गुड मॉर्निंग मेसेजसारखं
दरम्यान, बॉम्बस्फोटात असणारा आरोपी दाऊद याविषयी आम्ही आमची भूमिका मांडली आहे. दाऊदवर एवढे प्रेम असेल तर महाराष्ट्र सरकारच्या सर्व मंत्र्यांनी आपल्या केबिनमधून गांधीजींचा फोटो काढून दाऊदचा फोटो लावावा, आणि त्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला. तसेच महाराष्ट्रात नोटीस मिळणे हे गुड मॉर्निंग मेसेजसारखं झालं आहे, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली आहे.