मुंबई - लव्ह जिहाद आणि धर्मांतरबंदी कायदा आणावा यासाठी भाजपा आमदार नितेश राणे सातत्याने प्रयत्नशील आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी निघालेल्या हिंदू जनजागृती मोर्च्याच्या माध्यमातून नितेश राणेंनी हा प्रश्न उचलून धरला. अलीकडेच राणे यांनी लवकरच लव्ह जिहादचे अनेक पुरावे मी पत्रकार परिषदेत मांडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आज भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणेंनी व्हिडिओ पुरावे दाखवून विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
आमदार नितेश राणे म्हणाले की, विधिमंडळाच्या आतमध्ये असो वा बाहेर. महाराष्ट्रात धर्मांतर होत नाही. लव्ह जिहाद होतच नाही. हिंदू समाजात मुस्लिमांबद्दल गैरसमज पसरवले जातात अशी काही नेते मंडळी चुकीची माहिती देतात ती माहिती खोडून काढण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलावली. धर्मांतर नेमकं होते कसे याबाबतचे मी पुरावे महाराष्ट्रासमोर दाखवणार आहोत. दौंड येथील तरुणांचे धर्मांतर करण्यात आले. कुमेल कुरेशी असं आरोपीचे नाव असून १४ ऑक्टोबर २०२२ रोजी त्याने तरुणाला मुस्लीम धर्मांतर करण्यास भाग पाडले असा आरोप करत नितेश राणेंनी हा व्हिडिओ माध्यमांसमोर दाखवला.
तसेच कुमेल कुरेशीची बायको आणि त्याची बहिण कशारितीने धर्मांतर करतात हे व्हिडिओत सांगताना दिसतात. मुस्लीम समाजाच्या महिला व्हिडिओत काय बोलतायेत हे सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात धर्मांतर करतात हे कुरेशीची बायकोच व्हिडिओच सांगते. तरुणाचं धर्मांतर केल्यानंतर त्याचे कुटुंब घाबरून शहर सोडून गेले. आमच्यावर जे आरोप करतायेत त्या मुब्र्याच्या जितोद्दीन, अबू आझमी जे बोलतात त्यांनी हे ऐकायला हवं. त्या मुलीला तरुणाशी लग्न करायचा असेल, संसार करायचा असेल तर तुम्हाला त्याचा धर्म बदलण्याची आवश्यकता काय? असा सवाल आमदार नितेश राणेंनी विचारला.
दरम्यान, जर खरेच प्रेम असेल तर धर्म बदलण्याची गरज काय? तिने कुराण वाचावे, हिंदू देवी देवतांची पुजा करू नये ही बळजबरी का? आम्ही एक व्हिडिओ समोर आणलाय. यासारखे अनेक पुरावे आमच्यासमोर आहेत. विरोधक थयथयाट करतात. एकही प्रकरण नाही असं बोलतात. दहशतीनं घाबरवले जातात. कुटुंबाला दहशतीत ठेवतात. श्रीरामपूर इथं एवढी वाईट परिस्थिती आहे की, जिहादी विचाराच्या तरुणाने पहिल्यांदा आईसोबत लग्न केले आणि धर्मांतर करायला भाग पाडले. आता तिच्याच मुलीला लग्न करून धर्मांतर करण्यास भाग पाडतोय. याला धर्मांतर म्हणणार नाही? महाराष्ट्रात जिथे जिथे धर्मांतर होतोय तिथे आम्ही तुम्हाला घेऊन जातो. तुम्हाला सगळे पुरावे देतो असं आव्हान नितेश राणेंनी विरोधकांना केले.