मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. आता महायुती सरकार स्थापनेची तयारी सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण आहे, याविषयी जाणून घ्या. तर भाजपचे पराग शाह हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. ते मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. या मतदारसंघातून भाजपचे पराग शाह विजयी झाले आहेत.
यंदाच्या निवडणुकीत भाजपचे सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शाह यांनी आपले प्रतिस्पर्धी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा ३४,९९९ मतांनी पराभव केला आहे. सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शाह यांना ८५,३८८ मते मिळाली. तर शरद पवार गटाच्या राखी जाधव यांना ५०,३८९ मते मिळाली. पराग शाह यांचा हा सलग दुसरा विजय आहे. गेल्या वेळीही ते याच घाटकोपर पूर्व मतदारसंघातून विजयी झाले होते.
एकूण संपत्ती किती?निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, यंदाच्या निवडणुकीत भाजपचे पराग शाह हे सर्वात श्रीमंत उमेदवार होते. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, भाजप आमदार पराग शाह यांनी ३,३८३ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जाहीर केली आहे. याशिवाय, त्यांनी ६७.५३ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचाही उल्लेख केला आहे. पराग शाह यांच्या संपत्तीत गेल्या ५ वर्षात ५७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपली संपत्ती ५५०.६२ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते.
कोण आहेत पराग शाह?भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह हे रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत. ते एमआयसीआय ग्रुपचे अध्यक्ष आहेत. २५ वर्षांपासून पराग शाह हा ग्रुप चालवत आहेत. तसेच, पराग शाह २०१७ मध्ये भाजपच्या तिकिटावर घाटकोपर पूर्वमधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि ५३ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता.