लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजपचे आमदार राम सातपुते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरीत उल्लेख केल्याने संतप्त झालेले राष्ट्रवादीचे आमदार विधानसभेत वेलमध्ये उतरले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सातपुते माफी मागत नाही तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतल्यानंतर सातपुते यांनी माफी मागितली. भाजप आ. आशिष शेलार यांनीही सातपुते यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सातपुते तुम्ही ज्या मतदारसंघातून येता तो मतदारसंघ राखीव आहे आणि तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमुळे याची आठवण करून दिली. त्यावर सातपुते म्हणाले, की आंबेडकर यांनी घटना दिली म्हणून मी आज इथे आहे हे खरेच पण ‘तुमच्या पवाराने आरक्षण दिले नाही’ असे ते म्हणाले. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक होऊन वेलमध्ये उतरले आणि माफी मागेपर्यंत घोषणाच देत राहिले. शेवटी विधानसभा अध्यक्षांनी सातपुते यांना सूचना केली. सातपुते यांनी माफी मागितली व त्यानंतर कामकाज पूर्ववत सुरू झाले.