राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासमोरच भाजपा आमदाराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यास मारहण केल्याची घटना घडली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्याचबरोबर आता विरोधकांनाही सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. पुणे येथील ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन कार्यक्रमात हा प्रकार घडला. या कार्यक्रमास अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांच्यासह काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते.
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. तसेच, आमदार सुनील कांबळे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांला कानशिलात लगावतानाचा व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "काल अब्दुल सत्तार...आज भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी दाखवला सत्तेचा माज ... भाजपा आमदाराची मस्ती इतकी की ड्युटीवर असलेल्या पोलीस जवानाच्या थोबाडीत हाणली, थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदारामध्ये आली कशी? गृहमंत्री याची दखल घेणार का? पोलिस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबाव ही टाकला जाऊ शकतो...".
दरम्यान, अजित पवार यांचा आज सकाळपासूनच पुण्यात विविध ठिकाणी दौरा सुरू आहे. ससून रुग्णालयात देखील विविध वॉर्डच उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यादरम्यान, ससून रुग्णालयाच्या कोनशिलेवर आपले नाव नाही, यामुळे कांबळे यांना राग आला. त्यांनी आपला संताप व्यासपीठावरुन खाली उतरताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर काढला. राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जितेंद्र सुरेश सातव यांनी त्यांनी मारहाण केली. तसेच, यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्यास त्यांनी मारहाण केली.त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. त्याचबरोबर आता विरोधकांनाही सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.
या घटनेनंतर काय म्हणाले सुनील कांबळे?भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "मी ससूनमध्ये कोणत्याही पोलिसाला मारहाण केली नाही. तो माझ्या अंगावर पडल्यामुळे मी त्याला बाजूला सारून निघून गेलो." तसेच, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मी मारहाण केली नाही, त्याला सिव्हिल कपड्यांमध्ये असणाऱ्या पोलिसांनीच मारहाण केल्याचे सुनील कांबळे यांनी सांगितले.