बुलडाणा - शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपा आमदार श्वेता महालेंचा रुद्रावतार पाहयला मिळाला. चिखली येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेली मदत शेतकऱ्यांना न देता ती त्यांच्या बॅक खात्यात वळती करण्याचा प्रकार सुरू होता. ही बाब समजल्यावर श्वेता महाले यांनी चिखली येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा व्यवस्थापकाला चांगलेच फैलावर घेतले. तसेच आमदारांचा फोन उचलायचा नाही असा आदेश तुला कुणी दिला, तो आदेश दाखव अन्यथा फटके देऊन सरळ करेन अशा शब्दात बँक व्यवस्थापकाला खडसावले.
शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मिळालेली मदत आणि पिकविम्याची बँक खात्यात आलेली रक्कम शेतकऱ्यांना न देता ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करून त्या खात्यांना होल्ड लावण्यात येत होता. हे समजल्यावर आमदार श्वेता महाले यांनी बँक व्यवस्थापलाशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र राजकारण्यांचा फोन घ्यायचा नाही, असा आदेश असल्याचे बँक व्यवस्थापकाने बँकेत आलेल्या शेतकऱ्यांना सांगितलं. ही बाब समजल्यावर आमदार श्वेता महाले संतप्त झाल्या. त्यानंतर त्यांनी बँकेच्या स्थानिक शाखेत येत संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
आमदारांचे फोन घ्यायचे नाहीत असा कुणाचा आदेश आला आहे. तो आदेश तू दाखव. आदेश दाखवला नाहीतर तुला फटके देऊन सरळ करेन, असा इशारा श्वेता महाले यांनी दिला. तसेच इथ राहायचं असेल तर नीट राहा, इथे शेतकऱ्यांची कामं करण्यासाठी तुला पगार मिळतो, असेही त्यांनी या बँक व्यवस्थापकाला सुनावले.