Suresh Dhas Laxman Hake: 'खंडणी विरुद्ध चांगला माणूस एवढंच भांडण होतं. आमचा सरपंच गेला. या पोरांचं भांडण ओबीसी विरुद्ध मराठा भांडण नव्हतं रे', असे म्हणत प्रतिमोर्चे काढणाऱ्या धनंजय मुंडे समर्थक लक्ष्मण हाके आणि प्रकाश शेंडगे यांच्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी टीकास्त्र डागलं. संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी धाराशिवमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि प्रकाश शेंडगे यांनी धनंजय मुंडेंच्या बाजूने भूमिका मांडल्या. त्या मुद्द्यावरून आमदार सुरेश धस यांनी दोघांनाही उलट सवाल केला.
सुरेश धसांनी लक्ष्मण हाकेंना काय केली विनंती?
आमदार धस म्हणाले, "राजकारण कुणीकडे चाललंय? अरे संतोषचं भांडण आणि या पोरांचं भांडण ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होतं का? नाही रे... खंडणी विरुद्ध चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला. एवढंच भांडण आहे."
"मी जास्त बोलणार नाही. परत आम्ही बोललो की, म्हणतील हे जातीयवादी आहेत. हाके साहेब, तुमच्या पाया पडतो. कुणाचीही उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका. आईची शपथ तुम्हाला विनंती आहे. साहेब, तुम्हाला पाचशे मतं पडलीत की, पाच हजार? हाके साहेब, उचल हा शब्द जर वेगळा वाटत असेल, तर मी परत घेतो. पण, कुणाच्याही सांगण्यावरून कुणाचंही काही बोलू नका ही माझी तुम्हाला पाया पडून विनंती आहे", असे आवाहन सुरेश धस यांनी हाकेंना केले.
"तुम्हाला ८ हजार मते मिळाली अन् तुम्ही म्हणता की,..."
आमदार सुरेश धस यांनी प्रकाश शेंडगे यांच्यावरही निशाणा साधला. "प्रकाश अण्णा शेंडगे, तुमचे वडील मोठा माणूस होते. या राज्याला तुमच्या वडिलांनी बरंच काही दिलं आहे. दुग्ध विकास खात खूप चांगलं चालवलं. भाऊच्या धक्क्यावर सुद्धा शिवाजीराव शेंडग्यांनी खूप मोठं काम केलं. तुम्ही लोकसभेला उभे राहिले, तुम्हाला ८ हजार ५५० मते पडली. तुम्ही सुद्धा म्हणता की, संपूर्ण ओबीसी समाज धनंजय मुंडेंच्या मागे उभा आहे", असा खोचक टोला धस यांनी शेंडगेंना लगावला.
"ओबीसी समाज संपूर्ण मागे आहेत, तर आज इथे बसलेले कोण आहेत? फक्त मराठ्यांचे आहेत का? सगळ्या समाजाची लोकं आहेत ना. राम शिंदेंविरोधात रोहित पवार फक्त १३०० मतांनी निवडून आलेत. मग राम शिंदेंना मराठ्यांची मते पडली नाहीत का? नारायण आबा पाटील फक्त धनगरांच्या मतांवर आलेत का? कुठला जातीयवाद आणला? कुठला ओबीसी आणि मराठा आणता?", असा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचं समर्थक करणाऱ्या नेत्यांना केला.