पुरोगामी विचारधारेचे पाईक म्हणून तुम्ही...; भाजप आमदाराला रोखण्यासाठी रोहित पवारांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 11:42 AM2024-01-30T11:42:03+5:302024-01-30T11:42:57+5:30

रोहित पवारांनी अजित पवारांना कात्रीत पकडत भाजप आमदाराला रोखण्यासाठी आवाहन केलं आहे.

bjp mla T Raja program should not be allowed says ncp Rohit Pawars demand to Ajit Pawar | पुरोगामी विचारधारेचे पाईक म्हणून तुम्ही...; भाजप आमदाराला रोखण्यासाठी रोहित पवारांचं आवाहन

पुरोगामी विचारधारेचे पाईक म्हणून तुम्ही...; भाजप आमदाराला रोखण्यासाठी रोहित पवारांचं आवाहन

NCP Rohit Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये अनेकदा संघर्ष होत असल्याचं पाहायला मिळतं. राष्ट्रवादी शरद पवार गटातील युवा नेते आणि आमदार रोहित पवार हेदेखील आता अजित पवार या आपल्या काकांवर निशाणा साधू लागले आहेत. अशातच आज पुन्हा एकदा भाजप आमदार टी राजा यांच्या कोल्हापूर येथील नियोजित कार्यक्रमावरून रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावत टी राजा यांचा कार्यक्रम रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहनही केलं आहे.

"पवारसाहेबांना सोडूनतुम्ही प्रतिगामी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातला पुरोगामी विचारांचा दादा अद्यापही तसाच आहे, असं मानून टी राजा यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये ही सामान्य कोल्हापूरकरांच्या वतीने आपणास नम्र विनंती," असं रोहित पवार यांनी अजित पवारांना उद्देशून म्हटलं आहे. याबाबत रोहित यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्टही लिहिली आहे.

अजितदादांना टोला, भाजपवर हल्लाबोल; रोहित पवार नक्की काय म्हणाले?

"अजितदादा, आपण नेहमीच पुरोगामी विचारांना आपल्या जीवनात प्राधान्य दिलं आहे. पुरोगामी विचारांचे उद्गाते शहर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाची वैचारिक राजधानी असलेल्या कोल्हापूर शहरात आपण नुकतंच जाऊनही आलात. कोल्हापूरने नेहमीच महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली, परंतु याचाच राग मनात धरून प्रतिगामी शक्तींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीवरच वैचारिक आक्रमण करून इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र कोल्हापूर शहराची स्वतःची एक वैचारिक प्रतिकारशक्ती असल्याने अद्याप तरी प्रतिगामी शक्तींना यश आलेलं नाही. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या प्रक्षोभक द्वेषपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले आमदार टी राजा यांना कोल्हापूरमध्ये बोलावण्यात आलंय. हे आमदार कोल्हापुरात येऊन इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतील म्हणून अशा व्यक्तीचे कार्यक्रम कोल्हापूरसह महाराष्ट्रात कोठेही होऊ नये, अशी पुरोगामी विचारधारा जपणाऱ्या सामान्य कोल्हापूरकरांची इच्छा आहे," अशा भावना रोहित पवार यांनी मांडल्या आहेत.

अजित पवारांना आवाहन करताना रोहित पवार यांनी पुढे म्हटलं आहे की, "दादा, आपण पुरोगामी विचारधारेचे आधारस्तंभ आहात. आदरणीय पवार साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातला पुरोगामी विचारांचा दादा अद्यापही तसाच आहे असं मानून टी राजा यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये ही सामान्य कोल्हापूरकरांच्या वतीने आपणास नम्र विनंती. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी सत्ता असूनही सामान्यांच्या हिताला प्राधान्य न देता भाजपकडून केवळ महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची विचारधारा पुसण्याचं काम केलं जात असल्याने आपण पुरोगामी विचारधारेचे पाईक व उपमुख्यमंत्री म्हणून या प्रश्नी लक्ष घालाल ही अपेक्षा," असं रोहित पवार म्हणाले.

Web Title: bjp mla T Raja program should not be allowed says ncp Rohit Pawars demand to Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.