नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत यांची ११.२५ कोटींची संपत्ती सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) जप्त केली आहे. मुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यामुळे शिवसेना वि. भाजप वाद पुन्हा एकदा पेटला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप राऊतांनी केला. ईडीची कारवाई काल दुपारी झाली. त्यानंतर काल रात्री राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी उपस्थित होते. तिथे भाजपचेही काही आमदार हजर होते.
शरद पवारांनी राज्यातील सर्वपक्षीय आमदारांसाठी भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. संजय राऊत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील आमदारांची स्नेहभोजनाला उपस्थिती होती. उपस्थितांशी संवाद साधताना पवारांनी राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा उल्लेख केला. आज राऊतांकडे ईडीचे पाहुणे येऊन गेले, असं पवार म्हणाले. त्यानंतर त्यांनी माईक राऊतांकडे दिला.
संजय राऊत यांच्याकडे माईक जाताच भाजपच्या आमदारांनी तिथून काढता पाय घेतला. या कार्यक्रमाला भाजपचे १५-१६ आमदार हजर होते. राऊत यांच्याकडे माईक गेल्यावर या आमदारांनी तिथून निघणं पसंत केलं. पवारांच्या निवासस्थानातून निघालेले आमदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या निवासस्थानी पोहोचले. भाजप आमदारांचा हा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याचं समजतं.