पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने भाजप-सेना युतीमध्ये आणि राष्ट्रवादी काँगे्रस -काँगे्रस आघाडीमध्ये सत्तास्थापनेसाठी जोरदार खलबते सुरू आहेत. मुंबईमध्ये सर्वच पक्षांमध्ये क्षणाक्षणाला घडामोडी घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व १०५ आमदारांना ‘५ नोव्हेंबरपर्यंत कोणीही मुंबई सोडून बाहेर जाऊ नका,’ असे स्पष्ट आदेश दिले आहेत. यामुळे दिवाळीनंतर भाजपचे सर्व आमदार मुंबईमध्येच तळ ठोकून आहेत.राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागा, तर मित्रपक्ष शिवसेनेला केवळ ५४ जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपला स्पष्ट बहुतम मिळण्याची अपेक्षा होती; परंतु निवडणूक निकालानंतर सेना-भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असले, तरी मुख्यमंत्रिपद कुणाला, यासाठी दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राज्यात सुमारे २४ अपक्ष आमदार निवडून आले असून, त्यांपैकी जास्तीत जास्त आमदारांचा पांठिबा मिळविण्यासाठी भाजप, शिवसेना यांचा प्रयत्न सुरू आहे. तर, राष्ट्रवादी काँगे्रसने शिवसेनेचादेखील मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी गुगली टाकून राजकारण आणखीच पेटवून दिले आहे. काँग्रेसचे सर्व नेते दिल्लीत पक्षनेत्यांची भेट घेऊन पुढील वाटचाल ठरवत आहेत. यामुळे सध्या राज्याचे राजकारण ऐन हिवाळ्यात तापले आहे.मुंबईत सुरू असलेल्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत एकाही आमदाराने मुंबई सोडू नये, असे आदेश दिले आहेत. मुंबई-पुणे दोन तासांच्या अंतरावर असूनदेखील पक्षाध्यक्षांमुळे पुण्यातील सहा आमदारांनादेखील मुंबईतच मुक्काम करावा लागत आहे. .........पक्षाच्या वतीने सर्व आमदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत एकाही आमदाराने मुंबई सोडून जाऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. परंतु, गुरुवारी (दि. ३१) महापालिकेची स्थायी समितीची पूर्वनियोजिक बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणे आवश्यक असल्याने मी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची परवानगी घेऊन बैठकीसाठी उपस्थित राहिलो आहे. - सुनील कांबळे, नवनिर्वाचित आमदार व स्थायी समितीचे अध्यक्ष
महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपच्या आमदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत मुंबई न सोडण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 1:00 PM
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : जोरदार खलबते सुरू : सत्तास्थापनेसाठी मुंबईत जोरदार घडामोडी..
ठळक मुद्दे१०५ आमदारांना ‘५ नोव्हेंबरपर्यंत कोणीही मुंबई सोडून बाहेर जाऊ नका,’ असे स्पष्ट आदेश