भाजपा आमदारांनी डबल सह्या केल्या, अजित पवारांनी भर विधानसभेत पितळ उघडं पाडलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 07:07 PM2022-03-25T19:07:59+5:302022-03-25T19:08:41+5:30
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. तसंच विरोधकांनी सादर केलेल्या निवेदनांवरुन एक पोलखोलच भर सभागृहात केली.
मुंबई-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. तसंच विरोधकांनी सादर केलेल्या एका निवेदनाची पोलखोलच भर सभागृहात केली. धानाच्या मागणी संदर्भातील एक मागणी करणारं निवेदन भाजपाकडून अजित पवार यांना देण्यात आलं होतं. या निवेदनात भाजपा नेत्यांनी चक्क दोन-दोन वेळा सह्या करुन यादी वाढविण्याचा प्रयत्न केल्याचं पितळ अजित पवारांनी उघडं पाडलं. इतकंच नव्हे तर या यादीत ज्या आमदारांची नावं होती त्यातील बहुतांश आमदार आमच्याकडूनच तुमच्यात गेलेत, असा टोलाही लगावला.
अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर यावेळी भाजपा नेत्यांकडून आक्षेप घेण्याचाही प्रयत्न झाला. तेव्हा अजित पवार चांगलेच संतापले आणि आपण सारंकाही नीट बघूनच सांगत आहे. जे समोर आहे तेच सांगतोय, चूक मान्य करा. डबल सह्या करून आकडा वाढवण्याचा प्रयत्न झाला आहे, असं अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं.
नेमकं काय घडलं?
"विरोधी पक्षाकडून माझ्याकडे मुख्यमंत्र्याकरिता एक पत्रं देण्यात आलं. यात फडणवीस यांचीच सही नाही. बाकीच्यांच्या सह्या आहेत. मुनगंटीवारांनी त्यांची सही पहिली घातली. आमच्याकडून तुमच्याकडे गेलेले राधाकृष्ण विखे पाटील यांची दुसरी सही आहे. पण फडणवीसांचीच सही यात नाही. बबनराव पाचपुते वगैरे तर आमचेच आहेत. या सह्यांमधले १०-२० टक्के आमच्याकडून तुमच्याकडे गेलेलेच आहेत. ते काही बाहेरचे लोक नाहीत", अशी अजित पवार यांनी विरोधकांची फिरकी घेतली.
अजित पवार यांनी यावेळी विरोधकांनी दिलेल्या मागणी पत्रात आमदारांनी दोन-दोन वेळा सह्या केल्याचंही दाखवलं. "निवेदनातील सह्या मी मुद्दाम दाखवतो. एका पानावर राधाकृष्ण विखे पाटील यांची सही आहे. श्वेताताई महालेंची सही आहे. पुढे पाहिलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांची पुन्हा सही आहे. दादाराव केचेंचीही पुन्हा सही आणि श्वेता महालेंची सुद्धा दुसऱ्यांदा सही आहे", असं अजित पवारांनी आपल्या भाषणात म्हटलं. यावेळी भाजपा नेत्यांनी अजितदादा तुम्ही नीच पाहा दोन निवदेनं असतील असं म्हटलं. त्यावर अजित पवारांनी "नाही बाबा दोन कॉपी नाहीत. गिरीषजी मी बारकाईनं बघितलं. जे चुकलं ते चुकलं. डबल डबल सह्या करुन आकडा वाढविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एकरी धानाबाबत विरोधकांनी काही मागणी केली आहे. हरकत नाही. आम्ही सूचना केल्या आहेत. पण थोडं संयमानं घ्या. तुम्ही थोडंही पेशन्स ठेवत नाही. तुम्हाला कसं काहींनी सांभाळून घेतलं काय माहित", असा टोला अजित पवार यांनी विरोधकांना लगावला.