लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: 'आपले नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील हे बेताल आरोप करीत सुटले आहेत, आतापर्यंत खूप संयम बाळगला, आता आपण जशास तसे उत्तर देऊ,' असा निर्धार भाजप आमदारांनी सोमवारी एका बैठकीत व्यक्त केला. विधान भवनातील पक्ष कार्यालयात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे मंत्री उपस्थित होते.
मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, आ. प्रवीण दरेकर, आशिष शेलार, अतुल भातखळकर, नितेश राणे, महेश लांडगे आदींनी यावेळी जरांगे यांच्याबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या. जरांगे समाजासाठी आंदोलन करीत होते तोवर आम्ही एक शब्दही त्यांच्या विरोधात बोललो नाही. मात्र, आता त्यांची भाषा बदलली आहे, ते राजकीय भाषा बोलत आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरेंची स्क्रिप्ट चालवत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ते खालच्या पातळीवर बोलत आहेत, आता जशास तसे उत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही, अशी भावना सर्वांनी बोलून दाखवली. काही आमदारांनी माजी मंत्री राजेश टोपे, आ. रोहित पवार यांच्यावरही आरोप केले. जरांगे यांच्यावर सरकारने तातडीने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
आता एक शब्दही ऐकून घेणार नाही...या बैठकीनंतर भाजपचे 3 नेते जरांगेंविरुद्ध अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. प्रवीण दरेकर म्हणाले की, फडणवीस यांच्याविरुद्ध यापुढे आम्ही एकही शब्द ऐकून घेणार नाही.
शरद पवार, राजेश टोपे, रोहित पवार हे मराठा आरक्षण मिळाल्यानंतरही आंदोलनाला ताकद देत आहेत. जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. त्यांना प्रसिद्धीची नशा चढली आहे. प्रसाद लाड म्हणाले, की 'इट का जवाब पत्थर से' ही आमची पुढची नीती असेल.
'व्यथित झालो; पण, मराठा समाजाप्रतीची भूमिका स्पष्टफडणवीस म्हणाले, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे, ही आमची आधीपासूनची भूमिका आहे; व माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात ते दिलेही होते. मराठा समाजासाठीच्या सारथी संस्थेमार्फत अनेक योजना राबवायला सुरुवात झाली, अण्णासाहेब पाटील महामंडळाला बळकटी दिली. माझ्यावर जे काही आरोप होताहेत त्याने मी व्यथित झालो असलो तरी मराठा समाजाप्रती माझी आणि पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. आपण कोणाच्या आरोपांमुळे अस्वस्थ होण्याचे कारण नाही. आपण काय केले ते लोकांपर्यंत जाऊन ठामपणे सांगितले पाहिजे.