मुंबई :पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात काल भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेकीचा प्रयत्न करण्यात आला. ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर दूध दराबाबत सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी गोपीचंद पडळकर जात होते. मात्र या परिसरातच मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणही सुरू होते. त्यामुळे पडळकर हे या परिसरात येताच मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत त्यांच्यावर चप्पलफेक केली. या सर्व प्रकारानंतर गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका मांडत चप्पलफेक करणाऱ्यांचा आक्रमक शब्दांत समाचार घेतला आहे. मी काल जर समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.
इंदापुरात घडलेल्या घटनेबद्दल बोलताना गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, "ओबीसी समाज अत्यंत संयमाने शांततेत ओबीसी एल्गार मेळ्याव्यामध्ये आपली स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडत आहे. काल इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाले पाहिजेत, यासाठी सुरु असलेल्या आंदोलनास मी जात असताना नौटंकीचा हा प्रकार घडला. घटनेनंतर या भेकडांनी परत नौटंकीबाज करत मीडियात मुलाखती दिल्या आणि म्हणतात सदर घटना माझ्याच कार्यकर्त्यांनी केली. खरोखर मला यांची कीव वाटते. मुळात आम्ही नेहमीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेले समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे," असा घणाघाती आरोप पडळकर यांनी केला आहे.
धनगर समाजाला केलं आवाहन
चप्पलफेकीच्या घटनेवर भाष्य करत असताना गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. "मराठा आंदोलनामागील मुख्य सूत्रधार कोण आहे, हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे. कारण तो स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचाही खरा शत्रू आहे. काल जर मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते. परंतु आज मी माझ्या ओबीसी बांधवांना हेच आवाहन करतो आपण या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये. राज्यात शांतता ठेवावी. कारण आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी येत्या ११ तारखेला आपल्याला नागपूर येथे सुरू असेल्या हिवाळी अधिवेशनावर इशारा मोर्चा काढायचा आहे. त्यासाठी आपण लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहून आपला रोष शांततेच्या मार्गाने व्यक्त करावा," असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.