मुंबई – राज्यात एकीकडे मराठा आरक्षण पुन्हा पेटत असताना दुसरीकडे धनगर समाजाच्या विविध मागण्यांवरुन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर(BJP Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना(DCM Ajit Pawar) पत्र लिहिलं आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षात प्रस्थापितांनी धनगर समाजाची कोंडी केली होती. जोपर्यंत धनगर समाजाला ‘एसटी’चा दाखला मिळत नाही. मुघल, इंग्रज हर एक गनिमांना अंगावर घेऊन स्वातंत्र्याचा ध्वज उंचवणारा माझा समाज. माझ्या समाजाचा वापर आज प्रस्थापितांच्या सतरंज्या उचलण्यासाठी व्हावा, अशी काही मोजक्या घराण्यांची इच्छा आहे असं सांगत पडळकरांनी पवार कुटुंबीयांवर आरोप केला आहे.
गोपीचंद पडळकर म्हणतात की, आरक्षण(Dhangar Reservation) मिळत नाही तोपर्यंत कोंडी फोडण्याची ताकद फडणवीस सरकारनं धनगर समाजासाठी दिलेल्या "जे आदिवासांनी ते धनगरांना" या धोरणांतर्गत महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजनेसह २२ कल्याणकारी योजनेत होती. यासाठी १ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. मात्र प्रस्थापितांनी सत्ता ताब्यात घेऊन परत ३ कोटी धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्याचं काम केलंय. लॉकडाऊन, अतिवृष्टी, गावागावत हल्ले, आघाडीचं सरकार आलं की विस्थापितांना टाचेखाली चिरडण्याचा राक्षसी आनंद प्रस्थापितांना घ्यायचा असतो असं त्यांनी सांगितले.
तसेच आजही धनगर समाज अनेक सुविधांपासून वंचित आहे. धनगर वाड्यांवर नसलेल्या मुलभूत सुविधांमुळे अर्थचक्र बिघडले आहे. इतक्या सर्व समस्यांशी धनगर समाज कधी नव्हे इतका संघर्ष आजघडीला करतोय. त्यामुळे त्यांच्या लढवय्या बाहूंना बळ देऊन सामाजिक न्याय स्थापित करणं गरजेचे आहे. आगामी अर्थसंकल्पात तरी सत्य आणि न्यायानं धनगरांना निधी द्यावा. आश्वासनाचं पोतेरं फिरवू नये अन्यथा तुम्ही करत असलेल्या अन्यायाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. धनगरांच्या सक्षमीकरणाच्या योजना तातडीनं लागू करा, अन्यथा गाठ ३ कोटी धगनर बांधवांशी आणि गोपीचंद पडळकर यांच्याशी आहे लक्षात ठेवा असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
दरम्यान, मागील अर्थसंकल्पात फडणवीस सरकारनं केलेल्या योजनांचे फक्त बाह्य स्वरुप बदलून नव्या घोषणा केल्या परंतु या योजना फक्त कागदावरच राहिल्या. यामुळे धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्यासाठीच तुम्ही घोषणा केल्या होत्या का? असा सवाल धनगर समाजाच्या मनात वारंवार उपस्थित राहत आहे. अस्तित्त्वावर प्रश्न उभा राहिला की, साधी मुंगीसुद्धा बलाढ्य हत्तीला लोळवते, तुम्ही ३ कोटी धनगर समाजाला हिणकस वागणूक देताय असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.