ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकावणा-या मुंबई भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचा अध्यक्ष मोहित कंबोज याला रविवारी मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे वृत्त आहे. आप्पापाडा, कुरार व्हीलेज येथे बॉडीगार्ड आणि पोलीस संरक्षणात कंबोज एका कार्यक्रमाला आला होता.
त्यावेळी मनसेचे विभागअध्यक्ष अरुण सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी बॉडीगार्डच्या गराड्यात घुसून मोहित कंबोजवर हल्ला केला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलीसांनी लाठीचार्ज केला. मनसे कार्यकर्त्यांना अटक झालेली असून कुरार पोलीस स्थानकाबाहेर मनसैनिक मोठ्या प्रमाणात जमले आहेत.
शनिवारी मोहित कंबोजने राज ठाकरे यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रामध्ये मुंबईमध्ये उत्तर भारतीयांचं तुम्ही किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी काही नुकसान केलं तर त्याच्यापेक्षा दुप्पट नुकसान तुमचं करु अस लिहील होत.
तुम्हाला प्रेमाची भाषा समजत नसेल आणि फक्त मारहाणीचीच भाषा समजत असेल, तर ईंट का जवाब पथ्थर से देंगे असंही या पत्रात कंबोज यांनी म्हंटलं होतं. त्यानंतर शनिवारी रात्री कंबोजच्या मालाड येथील कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता.