मुंबई: राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली आहे. त्यामुळे भाजपाला नव्या मित्राची गरज आहे. यातच भाजपा-मनसे युतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे या चर्चांनी आणखीच जोर धरला.
पालघर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत भाजप-मनसेची युती पाहायला मिळेल. भाजपाचे पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी याबद्दलची अधिकृत घोषणा केली आहे. यानंतर आता आणखी ४ निवडणुकांमध्ये भाजप-मनसे एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती होण्याची शक्यता वाढली आहे. तसा आग्रह दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे.
स्थानिक गणितं काय?शिवसेनेनं साथ सोडल्यानं भाजपला मित्राची गरज आहे. पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी भाजपसोबत युतीचा आग्रह धरला आहे. भाजपसोबत युती झाली तर मनसेला फायदा होईल, असं वक्तव्य पुणे शहारध्यक्ष वसंत मोरे यांनी केलं. भाजपने हात पुढे केला तर मनसेही हात पुढे करेल असं वसंत मोरे म्हणाले. पुण्यात भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र राज्यात भाजप सत्तेत नसल्यानं त्याचा फटका भाजपला पुण्यात बसू शकतो. याशिवाय शिवसेनादेखील आता भाजपच्या सोबत नाही. त्यामुळे भाजप मनसेसोबत युती होऊ शकते.
नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्येही भाजप-मनसेची युती पाहायला मिळू शकते. गेल्या काही महिन्यांत मनसेप्रमुख राज ठाकरे सातत्यानं नाशिकचे दौरे करत आहेत. अमित ठाकरे यांनीदेखील तिथे लक्ष घातलं आहे. नाशिक महापालिकेत २०१२ मध्ये मनसेची सत्ता आली. मात्र त्यानंतर २०१७ मध्ये भाजपनं एकहाती सत्ता मिळवली. आजही नाशकात मनसेची ताकद आहे. सध्या या ठिकाणी भाजप-मनसेचे नेते युतीसाठी चाचपणी करत आहेत. बंद दाराआड बैठका सुरू आहेत.
कल्याण-डोंबिवलीत भाजपचे २, तर मनसेचा १ आमदार आहे. या भागातही मनसेची ताकद आहे. केडीएमसीमध्ये शिवसेना पहिल्या, तर भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. भाजपला मनसेची साथ मिळाल्यास शिवसेनेला निवडणूक जड जाऊ शकते. त्यामुळेच भाजप, मनसेच्या कार्यकर्त्यांनी युतीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे.