महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस लाच प्रकरणात आरोपी असलेल्या अनिक्षा जयसिंघानी हिचे वडील अनिल जयसिंघानी याला गुजरातमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या ७२ तासांपासून अनिल जयसिंघानी पोलिसांना चकवा देत होता. जयसिंघानीच्या शोधासाठी पोलिसांची ५ पथके काम करत होती. आरोपी शिर्डीतून गुजरातच्या बरदोली इथं गेल्याची माहिती पोलिसांना हाती लागली. त्यानंतर गुजरातमध्ये सापळा रचून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
अनिल जयसिंघानी यांच्या अटकेनंतर भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या फ्रंटमॅनला अटक झाली आहे. जे दुसऱ्यांसाठी खड्डे खोदतात ते स्वतःच एक दिवस त्या खड्ड्यात पडतात असंही मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. "उद्धव ठाकरेंचा फ्रंटमॅन बुकी अनिल जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी अटक केली. आता माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे."
"तुम्ही सर्व लवकरच उघडे पडणार आहात. जे दुसऱ्यांसाठी खड्डे खोदतात ते स्वतःच एक दिवस त्या खड्ड्यात पडतात" असं देखील मोहित कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. अनिल जयसिंघानीला पुढील तपासासाठी मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीवर आतापर्यंत १४-१५ गुन्हे नोंद आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून आरोपी जयसिंघानी हा फरार होता. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष ऑपरेशन राबवले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही आरोपीवर गुन्हे दाखल आहेत. आरोपी इंटरनेटचा शिताफीने वापर करून अनेकांच्या संपर्कात राहत होता. पोलीस आरोपीची आणखी चौकशी करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"