मुंबई - भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj Bharatiya) यांनी केलेल्या एक ट्विटमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकर नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना भेटणार" असं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे. यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार का? असा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. कंबोज यांनी केलेल्या या विधानानंतर भाजपा नेत्यांनी देखील त्याचं समर्थन केलं आहे.
"मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट 100%" असं म्हणत भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी देखील समर्थन केलं आहे. मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट 100% आहे. पुराव्याशिवाय ते बोलत नाहीत. पूर्ण पुराव्यांनिशी ते बोलतात. आजपर्यंत त्यांनी पुराव्यांच्या आधारेच भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडलेत. त्यांचं ट्विट अधिक महत्त्वाचं आहे. कोणाला तुरुंगात टाकण्याविषयी सार्वजनिक ठिकाणी बोलणं टाळायला हवं. पण कंबोज यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी तेच केलं आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
ज्यांच्या अटकेची भविष्यवाणी मोहित कंबोज यांनी केली होती, ते आज अटकेत आहेत. यामुळे त्यांच्या ट्विटमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचा हा तिसरा नेता कोण असणार? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. विशष म्हणजे, मोहित कंबोज यांनी हे ट्विट अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच केल्याने याची अधिक चर्चा होत आहे. त्यांचे हे ट्विट दबाव निर्माण करण्यासाठी तर नाही ना? असा प्रश्नही राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
मोहित कंबोज यांनी आणखी एक ट्विट करत, आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन संबंधित बड्या नेत्याचा खुलासा करणार आहोत, असेही म्हटले आहे. याशिवाय, आपण संबंधित नेत्याची देशातील आणि परदेशातील मालमत्ता, बेनामी कंपन्या, खास मैत्रिणीच्या नावावर असलेली मालमत्ता, मंत्री म्हणून जबाबदारी असलेल्या अनेक खात्यांच्या माध्यमातून केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणी मालमत्ता, यांसंदर्भात मोठा खुलासा करणार असल्याचेही कंबोज यांनी म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे आता ती खास मैत्रीण कोण? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.