नवी दिल्ली - महाराष्ट्रात शिवसेनेच्या जाहिरातीवरून भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांच्याहून अधिक पसंती मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांना आहे अशाप्रकारे जाहिरात सर्वच वृत्तपत्रात आली त्यानंतर भाजपा नेत्यांनी त्यावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेला खडेबोल सुनावले. त्यात भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली होती.
बेडूक आणि हत्ती यावरून पत्रकारांनी आज अनिल बोंडे यांना प्रश्न विचारताच त्यांनी सारवासारव करत म्हणाले की, एखाद्या जाहिरातीनं मैत्रीत आणि एकीत बाधा येणार नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात विकासाच्या दृष्टीने प्रकल्प राबवले जात आहेत. महाराष्ट्राला शिंदे-फडणवीस सरकारची गरज आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचनाचे प्रकल्प रेंगाळले होते हे सर्व मार्गी लागतात. या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडदा टाकला आहे. मी भाजपाचा साधा कार्यकर्ता आहे. मलाही भावना आहेत. भावना व्यक्त करणे हे वाईट नसते. परंतु भावनेपेक्षाही काही गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. संजय राऊतांनी फेविकॉलच्या जोडमध्ये नाक खुपसू नये आता जाहिरातीचा वाद संपला आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच २०१९ ला जनतेने शिवसेना-भाजपाला मत देऊन सरकारमध्ये बसण्याची संधी दिली. परंतु उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. महाभकास आघाडी निर्माण केली आणि अडीच वर्ष राज्य केले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मानणारी शिवसेना पुन्हा भाजपासोबत आली. आता या सरकारच्या माध्यमातून जनतेची कामे मार्गी लागत आहेत असं अनिल बोंडे यांनी सांगितले.
त्याचसोबत काँग्रेसला औरंगजेब, टीपू सुल्तान चालतो. परंतु ज्यांनी राष्ट्रासाठी संपूर्ण आयुष्य वेचले असे हेगडेवार, गोळवलकर गुरुजी आणि देशासाठी ज्यांनी प्राण अर्पण केले ते काँग्रेसला चालत नाही. महाराणा प्रतापही काँग्रेसला चालणार नाही. १९४७ काळापासून लोकांमध्ये गुलामीची मानसिकता लादण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता तोच आता कर्नाटकात सुरू झाला आहे अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी कर्नाटक सरकारने पाठ्यपुस्तकातून आरएसएसचा इतिहास वगळला त्यावर दिली.
काय म्हणाले होते अनिल बोंडे?
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांना भाजपाने, जनतेने स्वीकारले आहे. ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही. शिंदेंना त्यांचे सल्लागार चुकीचे सल्ले देत असतील. उद्धव ठाकरेंना मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटत होता. आता शिंदेंना वाटायला लागला आहे. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही, अशा शब्दांत बोंडे यांनी शिंदेंना टोला लगावला होता.