Maharashtra Politics: कर्नाटकात प्रचाराची धूम सुरू आहे. प्रचाराच्या थोफा आता थंडावतील. १० मे रोजी कर्नाटकात मतदान होणार आहे. कर्नाटकात प्रचारासाठी राज्यातील अनेक नेते गेले आहेत. एका प्रचारसभेला संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मी पुन्हा येणार म्हटले की येतोच, असे म्हटले होते. या विधानावर राज्यात राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचा सुवर्णकाळ होता. ते पुन्हा यावेत ही जनतेची इच्छा आहे, असे मत भाजप नेत्यांनी मांडले आहे.
भाजप खासदार अनिल बोंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस पुन्हा यावे ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्राने सुवर्णकाळ पाहिला.कुठलाही डाग लागू देता पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले, असे कौतुकोद्गार अनिल बोंडे यांनी काढले. तसेच अडीच वर्षात महाविकास आघाडीने हे काम पुसण्याचे काम केले, अशी टीकाही यावेळी केली.
सर्वसामान्य जनतेला वाटते की, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व्हावेत
बारसु रिफायनरी प्रकल्प, समृद्धी महामार्गात अडथळे आणण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला वाटते की, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व्हावेत, असे अनिल बोंडे म्हणाले. दुसरीकडे, संजय राऊत हे तोंड फाटेपर्यंत राष्ट्रवादीची स्तुती करत होते. सामनाच्या अग्रलेखात त्याच राष्ट्रवादीचे तुकडे पाडण्यासाठी संजय राऊत अग्रलेख लिहीत आहेत, हा दुटप्पीपणा आहे, या शब्दांत बोंडे यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांना टार्गेट केले जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम संजय राऊत करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अस्वस्थता सर्वाधिक ही महाविकास आघाडीत आहे. संजय राऊत यांना फोडाफोडीचे काम जमते. त्यामुळे राष्ट्रवादीलाही ते फोडणार आहे, असा दावा बोंडे यांनी केला.