सोनिया गांधींसमोर खरोखर रडले होते का? राहुल गांधींचा दावा, अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 02:10 PM2024-03-18T14:10:48+5:302024-03-18T14:13:02+5:30
Ashok Chavan Reaction On Rahul Gandhi Claims: भारत जोडो न्याय यात्रेची सांगता होताना मुंबईत झालेल्या सभेत राहुल गांधींनी काँग्रेस सोडणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते.
Ashok Chavan Reaction On Rahul Gandhi Claims: भारत जोडो न्याय यात्रेची मुंबईत सांगता करताना झालेल्या एका मोठ्या सभेत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि काँग्रेस पक्ष सोडलेल्या नेत्यांवर टीका केली. काही दिवसांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या आणि राज्यसभेत खासदार झालेल्या अशोक चव्हाण यांच्याकडे राहुल गांधींचा रोख होता असे सांगितले जाते. राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
याच प्रदेशचे वरिष्ठ नेता काँग्रेस सोडतात आणि रडून माझ्या आईला सांगतात की, सोनियाजी मुझे शर्म आ रही हैं, मेरे में इस शक्ती से लढने की हिंमत नाही हैं. में जेल नहीं जाना चाहता हूं...' हे एक नाही, अशा हजारो लोकांना घाबरविले आहे आणि ते सोडून गेले आहेत. अशा शब्दांत राहुल गांधींनी काही नेत्यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. शिवसेना, राष्ट्रवादीचे लोक असेच गेले नाहीत, शक्त्तीने त्यांचा गळा पकडून भाजपाकडे नेले आहे, ते सगळे घाबरून गेले आहेत, असे सांगत राहुल गांधींनी टीका केली होती. याबाबत अशोक चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
नेमके काय म्हणाले अशोक चव्हाण?
राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, राहुल गांधी यांनी कुणाचे नाव घेतले नाही. पण, राहुल गांधी यांचे विधान माझ्यासंदर्भात असेल, तर ते हास्यास्पद आहे. तथ्यहीन आहे. मी सोनिया गांधी यांना भेटलो नाही. सोनिया गांधी यांना भेटून माझ्या भावना व्यक्त केल्यासंदर्भात जे विधान करण्यात आले आहे, ते चुकीचे आहे. दिशाभूल करणारे आहे. त्यामध्ये काही तथ्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस सोडेपर्यंत पक्षाचे काम करत राहिलो आहे. त्यामुळे काँग्रेस सोडणार असल्याबाबतची माहिती कुणालाही नव्हती, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. देशातील ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थांमध्ये राजाचा आत्मा आहे. ईव्हीएम शिवाय राजा निवडणूक जिंकू शकत नाहीत. निवडणूक आयोगाला आम्ही सांगितले विरोधी पक्षांना या मशिन खोलून दाखवा, त्या कशा चालतात ते आमच्या तज्ज्ञांना दाखवा. मशिनमधून जी कागदाची चिठ्ठी निघते, त्याची मोजणी करा, पण निवडणूक आयोग नाही म्हणते. या सिस्टिमला त्याची मोजणी नको आहे. लोक विचार करतात की, आम्ही सगळे भाजपविरोधात, नरेंद्र मोदी या एका व्यक्तीविरोधात लढत आहोत, पण तसे नाही. आमची लढाई एका व्यक्तीविरोधात नाही, तर एका शक्तीविरोधात आहे. देशातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मी एकटा चाललो नाही, देशातील सगळे विरोधी पक्ष व लोक माझ्याबरोबर चालले. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, महिला, युवांच्या प्रश्न, अग्नीवीरांचे प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा होती. हा देश एकमेकांचा तिरस्कार करणारा नव्हे, तर एकमेकांवर प्रेम करणारा आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या संबोधनात म्हटले होते.