“आरोप झाल्यानंतर लगेच राजीनामे घेण्याची काँग्रेसची पद्धत चुकीची”; अशोक चव्हाणांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 17:48 IST2025-02-11T17:47:56+5:302025-02-11T17:48:28+5:30
BJP MP Ashok Chavan News: राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला आहे. विनाकारण कोणत्याही व्यक्तीला बदनाम करून राजीनामा घेणे चुकीचे आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

“आरोप झाल्यानंतर लगेच राजीनामे घेण्याची काँग्रेसची पद्धत चुकीची”; अशोक चव्हाणांचे मोठे विधान
BJP MP Ashok Chavan News: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे. यावरून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच परभणी प्रकरणावरूनही विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत. यातच आता भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, राजकारणापोटी कोणाला बदनाम करण्यासाठी राजीनामा घेण्याचे सत्र काँग्रेसच्या काळात होते. ते फार चुकीचे आहे. आरोप- प्रत्यारोप होत असतात. हा राजकारणाचा एक भाग आहे. यात माझी काही तक्रार नाही. परंतु, केवळ आरोपाच्या आधारावर काँग्रेसच्या काळात राजीनामा घेतला गेला, हे निश्चित चुकीचे आहे. राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.
आरोप झाल्यानंतर लगेच राजीनामे घेण्याची काँग्रेसची पद्धत चुकीची
पुढे बोलताना अशोक चव्हाण यांनी सांगितले की, आरोप झाले की, लगेच राजीनामा घेण्याची काँग्रेसमध्ये असलेली पद्धत चुकीची आहे, हे माझे मत तेव्हाही होते आणि आताही आहे. त्यावेळी राजीनामे घेतले गेले. मग कोणत्या आधारावर राजीनामे घेतले गेले? विनाकारण कोणत्याही व्यक्तीला बदनाम करून राजीनामा घेणे चुकीचे आहे. दोषी असेल तर कारवाई करा. पण आरोप कोणीही करायचे. मी स्वत: या गोष्टीतून गेलेलो आहे. मी कोणत्याही प्रकरणाबाबत हा विषय बोलत नाही. बीडच्या प्रकरणाच्या संदर्भानेही हे बोलत नाही. जनरल बोलत आहे, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम आणि आग्रही असले तरी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हेही आक्रमकपणे धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी करत आहेत.