BJP MP Ashok Chavan News: बदलापूरमध्ये घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. या घटनेनंतर चिंतेचे वातावरण आहे. अशा घटनांचा पीडितेच्या आयुष्यावर तसेच तिच्या कुटुंबावर मोठा परिणाम होतो. हा राजकीय मुद्दा नाही. मात्र काही लोक गदारोळ माजवून त्यावर राजकारण करत आहेत, त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, असे भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. बदलापूर घटनेवरून महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. याबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षण हा राजकीय नाही तर सामाजिक प्रश्न आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा निवडणुकांशी जोडणार नाही, कारण हा अनेक वर्षांपासून सुरू असलेला मुद्दा आहे. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळाले, त्यांना बऱ्याच अंशी दिलासा मिळाला आहे. काही प्रश्न प्रलंबित आहेत, त्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात येते. या सर्वपक्षीय बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते येत नाहीत तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेतेही उपस्थित राहत नाहीत, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात विधानसभा लढवणार
आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार महायुती सरकार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. निवडणुकीच्या निकलानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण असणार? हे महायुतीतील सर्व पक्ष एकत्रित ठरवतील. विधानसभेला कोणाला किती जागा मिळाल्या हे पू्र्णपणे तेथील परिस्थितीवर अवलंबून आहे. जिथे ज्या पक्षाची जिंकण्याची शक्यता जास्त आहे त्या पक्षाला ती जागा दिली पाहिजे, असे सूचक विधान अशोक चव्हाण यांनी केले. ते एबीपीशी बोलत होते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत प्रतिक्रिया दिली. महायुतीच्या बैठका झाल्या. मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली का? महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार?, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, सरकार आल्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल ते आम्ही ठरवू, असे अजित पवार म्हणाले.