मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी, मला मुख्यमंत्री व्हावे असे वाटत आहे, असे म्हटले होते. जयंत पाटील यांनी प्रकट केलेल्या सुप्त इच्छेनंतर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. त्यातच भाजप खासदार गिरीश बापटांनी टोला लगावत, मला तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते आहे, असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी गिरीश बापट मुंबईत आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ''तुमच्या माध्यमातूनच जयंत पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, हे ऐकत आहे. आता मुख्यमंत्रीपदाबाबत जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांनी ठरवायचे आहे. मला विचाराल, तर मला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते, असा टोला गिरीश बापट यांनी लगावला.
सर्व खासदारांच्या बैठकीबाबत बोलताना ते म्हणाले की, केंद्र आणि राज्याचे काही समान प्रश्न आहेत. त्यावर राज्य आणि केंद्र सरकारकडून काही निर्णय घेता येईल, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. रेल्वे सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. केंद्राने राज्याला अधिकाधिक निधी देण्याबाबतही चर्चा झाली. तसेच राज्यातील अपूर्ण प्रकल्पांचा आढावाही यावेळी घेण्यात आला. दर दोन ते तीन महिन्यांनी अशी बैठक झाली, तर प्रश्न सोडवणे सुलभ होईल, असे बापट यांनी सांगितले.
खासदारांच्या बैठकीत सीमाप्रश्नी चर्चा झाली असून, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नी सर्व खासदारांनी साथ द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले, असे बापट यांनी सांगितले.