भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि सभागृह नेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येत भाजपाचे खासदार कपिल पाटील यांचा हात असल्याचा आरोप म्हात्रे यांची आई यमुनाबाई यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. हत्या करणारे आरोपी जोपर्यंत पकडले जात नाहीत तोवर विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.म्हात्रे यांची हत्या अमानुषपणे झाली. तिचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. त्यांच्या घराजवळ हत्या होते ते पाहता या सरकारच्या काळात गुंडांचे धाडस किती वाढले आहे ते दिसते, असा आरोप राणे यांनी केला. म्हात्रे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यासाठी राणे शुक्रवारी अंजूरफाटा येथील त्यांच्या घरी आले होते. तेव्हा त्यांनी म्हात्रे यांची पत्नी वैशाली व मुलगी हर्षाली यांच्यासोबत एकांतात चर्चा केली आणि घटनेची माहिती घेतली. म्हात्रे यांची आई यमुनाबाई यांची त्यांनी भेट घेतली तेव्हा खासदार कपील पाटील यांचा या हत्येत हात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांचे सांत्वन करीत राणे यांनी आरोपींवर कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. हत्या झालेल्या ठिकाणाची पाहणी करीत त्यांनी पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्याकडून तपासाबाबत तपशील घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नसल्याचा आरोप केला. गुंडांना राजकीय आशीर्वाद असल्याने घराजवळ हत्या करण्याचे धाडस केल्याचे सांगत त्यांनी भाजपाला लक्ष्य केले. आता म्हात्रे यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. मनोज म्हात्रे यांची अमानुषपणे झालेली हत्या पाहून मन हेलावले. मुख्यमंत्र्यांकडे असलेले गृहखाते निष्क्रिय झाले आहे. त्यांनी गुंडांना पक्षांत प्रवेश देऊन पदे देण्यास सुरुवात केल्याने पोलीस काम कसे करतील? त्यामुळेच हत्येला ११ दिवस उलटूनही आरोपींना पोलीस पकडू शकले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या वेळी राणेंसोबत माजी खासदार सुरेश टावरे, माजी आमदार योगेश पाटील, प्रदेश सरचिटणीस प्रदीप (पप्पू) रांका, तारीक फारूकी, राकेश पाटील, बाळकृष्ण पूर्णेकर, नगरसेवक इम्रान खान, मधुकर जगताप, शहराध्यक्ष शोएब खान, शहर सचिव ताज खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
म्हात्रे हत्येत भाजपा खासदाराचा हात?
By admin | Published: February 25, 2017 4:57 AM