नागपूर, दि. 1- भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपालाच घरचा आहेर दिला आहे. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले आहेत. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांची कीव येते. केंद्रातून सर्वात कमी पैसा महाराष्ट्रात आला. महाराष्ट्राच्या सरकारला खासदारांची किंमत नाही, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. केंद्राच्या निधीबाबत मी मुख्यमंत्र्यांकडे विषय उपस्थित केला तर त्यांनी खासदारांची बैठक बोलावणे बंद केलं, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री विदर्भाचा असो की कुठल्याही भागाचा मुख्यमंत्री पद मिळालं की तो व्यक्ती बदलतो, अशी थेट टीका नाना पटोले यांनी केली आहे.
नागपूरमध्ये आयोजीत विदर्भातील सिंचन सुविधा आणि शेतकऱ्यांचे अश्रृ या कार्यक्रमात खासदार नाना पटोले बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत शेतीचं वास्तव सांगितलं तर मोदी माझ्यावर भडकले, कारण त्यांना असं काही ऐकण्याची सवय नाही, असं नाना पटोले यांनी म्हंटलं आहे. मी सध्या हिटलिस्ट वर आहे, पण मी आता कुणाला घाबरत नाही, असंही ते म्हणाले. केंद्रातील मंत्री दहशतीच्या वातावरणात असतात म्हणून मला मंत्रीपद नको, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. सर्व विकास नागपुरचाच होतो आहे आणि नागपूरचं घाण पाणी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पाठवताय. तुमची मेट्रो नागपुरातच काय फिरवता, भंडाऱ्यापर्यंत येऊ द्या जरा आमचाही विकास होऊ द्या, असंही नाना पटोले या कार्यक्रमात बोलताना म्हणाले आहेत.
दिल्लीतून बघितल्यावर महाराष्ट्र मला भिकारी दिसतो, पण ही स्थिती बदलण्यासाठी मी नेहमी भांडत राहणार, असं वक्तव्यही त्यांनी केली आहे.