Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते ईडीच्या रडावर आल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० नेत्यांवर ईडीची करडी नजर असून, यापैकी ५ नेत्यांच्या प्रकरणांची कागदपत्रेही तयार झाली असल्याचा मोठा दावा एका भाजप खासदाराने केला आहे.
सुरुवातीला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अगदी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. यानंतर आता मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली होती. मोहित कंबोज यांच्यानंतर आता भाजप खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या १० नेत्यांबाबत मोठा दावा केल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादीच्या १० बड्या भ्रष्ट नेत्यांची प्रकरणे तपास यंत्रणांना देणार
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १० बड्या भ्रष्ट नेत्यांची प्रकारणे केंद्रीय तपास यंत्रणांना देणार असून, यातील ५ जणांची कागदपत्रे तयार झाल्याचा गौप्यस्फोट माढाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे. आत्तापर्यंत किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज अशा पद्धतीचे आरोप करत होते. आता भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर मैदानात उतरले असून, राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष सर्वात भ्रष्ट असल्याचा घणाघात निंबाळकर यांनी केला. आपण तक्रार देणार असणाऱ्या दहा पैकी पाच राष्ट्रवादी बड्या नेत्यांच्या पुराव्याच्या फाईल तयार झाल्याने त्या ईडी आणि सीबीआयडीकडे देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
ईडीची वक्रदृष्टी पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे
सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार याना क्लिन चिट दिल्याचा आभास निर्माण केला जात असला तरी जनतेच्या पैशाचा भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. पवार यांच्या लवासा प्रकरणावर देखील सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारल्याचे सांगताना या जमिनी देताना जलसंपदा मंत्री कोण होता? जमिनी कशा दिल्या, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. जलसंपदा मंत्रालयात अनेक प्रकरणात घोटाळे झाले असल्याचे आरोप असल्याने या चौकशा तर होणारच, असा इशाराही निंबाळकर यांनी दिला. यानंतर पुन्हा एकदा राज्यात ईडीची वक्रदृष्टी राष्ट्रवादीकडे वळणार याचे संकेत मिळू लागले आहेत.
दरम्यान, फलटण येथील एक बडा नेता कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाला, जेलमध्ये जाण्यापेक्षा आता भाजपत गेलेले बरे, असे सांगत सुटला असला तरी कृष्ण खोरे महामंडळात अनेक फाईलवर सह्या केल्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. आता भाजपमध्ये आला तरी या प्रकरणांच्या चौकशी होणार, असे निंबाळकर यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच सोलापूर जिल्ह्यातील उजनीचे पाणी बारामतीकडे वळविण्याचा निर्णय आता कायमचा रद्द केला जाणार असून नीरेचे पाणी पुन्हा दुष्काळी सांगोला आणि सोलापूरला परत मिळविले जाणार असल्याचे रणजित निंबाळकर म्हणाले.