Maharashtra Politics: इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. महाविकास आघाडीकडून या बैठकीची जोरदार तयारी सुरू आहे. यातच आता काँग्रेस फुटीबाबत सातत्याने दावे केले जात जात आहे. भाजप नेते आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी आता काँग्रेस पक्ष फुटीबाबत विधान केले आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत ऐतिहासिक बंड झाले. त्यानंतर एका वर्षाच्या अंतराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आणि अजित पवार सत्तेत सहभागी झाले. यानंतर आता काँग्रेसमध्ये फुट पडण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे, असा दावा भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे.
काँग्रेसचे आमदार आणि खासदार अस्वस्थ
राज्यात आधी शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. या दोन्ही गटांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. लोकसभा निवडणुकीला अजून आठ ते नऊ महिने बाकी असून येत्या काळात आता काँग्रेसमध्ये फुट पडणार आहे. काँग्रेसचे आमदार आणि खासदार अस्वस्थ आहेत. ते कधीही भाजपमध्ये प्रवेश करतील, असे निंबाळकर यांनी म्हटले आहे. तसेच सत्तेच्या विरोधात काँग्रेसचे आमदार, खासदार राहूच शकत नाहीत. काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेतूनच काँग्रेस पक्ष फुटणार असून, सध्या काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे, असा दावा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे.
दरम्यान, पवार कुटुंब एकत्र राहणे गरजेचे असून अजित पवारांसह अन्य आमदार सहकारी भाजपकडे गेले आहेत. राष्ट्रवादी पक्षातले वाद मिटवून शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजप पक्षात आल्यास देशाचे आणि राज्याचे कल्याणच होईल. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट होतील. शरद पवार भाजपमध्ये आल्यास त्याचा आम्हांला आनंदच होईल, असे नाईक निंबाळकर म्हणाले.