Maharashtra Politics: परतीच्या पावसामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसल्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी आणि दिलासा द्यावा, या मागणीसाठी विरोधक आग्रही तसेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यानंतर आदित्य ठाकरे (Aaditay Thackeray) यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावरून भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका केली आहे. मुख्यमंत्री असताना कधी महाराष्ट्र पाहिला नाही आणि आता पद गेल्यावर महाराष्ट्र पाहण्यासाठी दौरे करत आहेत, असा टोला सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे.
भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ज्या महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री होतो तो महाराष्ट्र दिसतो कसा हे पाहण्यासाठी ठाकरे सध्या राज्याचा दौरा करत आहे. पद गेल्यानंतर महाराष्ट्राची स्थिती पाहायला त्यांना वेळ मिळाला आहे. मात्र, मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कधी पाहिलाच नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना निवांत वेळ दिला आहे, अशी खोचक टीका सुजय विखे-पाटील यांनी केली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल
विरोधकांकडून सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे, यावर भाष्य करताना, यावर कॅबिनेटमध्ये चर्चा सुरु असते. NDRFच्या निकषापेक्षा जास्त मदत करण्याबाबत बागायत, जिरायत क्षेत्रानुसार मदत देणे याबाबत चर्चा सुरु आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल अशी मला खात्री आहे, असा विश्वास सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त करणारे बॅनर झळकावण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही सर्वांचीच तशी इच्छा असल्याचे म्हटले होते. यावर, राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल ना होईल हा दुसरा भाग आहे. परंतु त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री कोण होईल याचे नाव पहिले निश्चित करावे, अशी फिरकी सुजय विखे पाटील यांनी घेतली. राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार असून ते पुढील दहा ते पंधरा वर्षे हटत नाही, असे सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"