पुणे: भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण या भेटीनंतर उदयनराजेंनी केलेल्या विधानानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. त्याच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये आले होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. अजित पवार यांची कामानिमित्त भेट घेत असल्याची माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली. तत्पूर्वी उदयनराजे भोसले यांनी काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली होती.
बैठकीनंतर काय म्हणाले उदयनराजे?अजित पवारांची भेट घेऊन उदयनराजे बाहेर पडताच माध्यम प्रतिनिधींनी गर्दी केली. तुम्ही राष्ट्रवादीत घरवापसी करणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण सर्वधर्म समभावाचं होतं. त्याप्रमाणे माझं धोरण सर्वपक्ष समभावाचं आहे, असं सूचक विधान उदयनराजेंनी केलं.
उदयनराजेंची राष्ट्रवादीशी वाढती जवळीक२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले. मात्र अवघ्या काही महिन्यांत त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीनं जागा कायम राखली. यानंतर भाजपनं उदयनराजेंना राज्यसभेवर संधी दिली. गेल्या काही दिवसांत राजेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उदयनराजे निवडून आले. यात राष्ट्रवादीचा महत्त्वाचा वाटा होता. राष्ट्रवादीनं राजेंविरोधात उमेदवार दिला नव्हता.