Maharashtra Political Crisis:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, राज्यभर दौरे सुरू आहेत. यातच एकनाथ शिंदे गटाला राज्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. यातच आता आदित्य ठाकरे जळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, तब्येतीच्या कारणास्तव दौरा रद्द झाल्याचे सांगितले जात आहे. यातच उद्धव ठाकरेंना दोन वर्षांत जमलं नाही, ते एकनाथ शिंदेंनी आठ दिवसांत करुन दाखवलं, असा टोला भाजपने लगावला आहे.
केवळ सत्तेसाठी पदे अन् राजकारण करु नका, आधी मातीशी निष्ठा राखा, शेतकऱ्यांची निष्ठा राखा, मग राजकारण करा या शब्दांत भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. चाळीसगाव तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी उन्मेश पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एकीकडे कामांना परवानगी द्यायची नाही, दुसरीकडे निष्ठा यात्रा काढून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा आदित्य ठाकरे यांना अधिकार नसल्याची टीका उन्मेश पाटील यांनी केली.
सरकार बदल्यानंतर ८ दिवसात या प्रस्तावाला मान्यता मिळाली
खान्देशात गिरणा नदीवर बलून बंधाऱ्यासाठी अनेकदा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र, तब्बल दोन वर्ष उलटूनही परवानगी मिळाली नाही. ती परवानगी मिळाली असतील, तर खान्देशाच्या मातीशी निष्ठा राखण्याचा आणि बोलण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला असता, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरेंवर करत, सरकार बदल्यानंतर आठ दिवसात या प्रस्तावाला मान्यता मिळते, आणि आदित्य ठाकरे हे मंत्री असतानाही दोन दोन वर्ष त्याला मान्यता मिळत नाही, याला काय म्हणावे, असा प्रश्न पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच राजकारण करण्यापेक्षा तिरंग्यावर निष्ठा दाखवा, असा सल्लाही पाटील यांनी दिला.
दरम्यान, राजकारण करण्यापेक्षा विकास कामांवर लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती, असा टोला पाटील यांनी लगावला. पाचोरा तालुक्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. पाचोरा तालुक्यातील कट्टर शिवसैनिक तसेच जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांच्यासह १०० समर्थक यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी रावसाहेब पाटील यांच्यासह संपूर्ण जिल्हा परिषदेचा गट शिंदे गटात सहभागी झाला आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच कट्टर शिवसैनिकांनी शिंदे गटात सहभागी झाल्याने खळबळ उडाली आहे.