मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्या आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेही शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. एकीकडे नारायण राणे यांच्या मुंबईतील घरावर महापालिका कारवाई करण्याच्या तयारीत असतानाच दुसरीकडे राणे कुटुंबीयांचा मालवण जिल्ह्यातील नीलरत्न बंगल्यावर हातोडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रातील मोदी सरकारने यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. मालवण जिल्ह्यातील चिवला समुद्रकिनाऱ्यावर राणे कुटुंबीयांचा नीलरत्न हा बंगला आहे. हा बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये ही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नारायण राणेंच्या भूमिकेकडे लक्ष
मुंबई महापालिकेने बंगल्यावर कारवाईची तयारी केल्याने आक्रमक झालेले राणे कुटुंबीय या प्रकरणात काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे. दुसरीकडे, नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याबाबत कारवाई करण्याबाबत मुंबई महापालिकेची हालचाल सुरू झाली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी राणेंच्या बंगल्याची पाहणी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राणेंच्या बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोसबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या नोटिसीनंतर नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपूत्र आक्रमक झाले होते. नारायण राणे यांनी आपल्या बंगल्यात एका इंचाचेही अनधिकृत बांधकाम नसल्याचा दावा केला होता. तर नितेश राणे यांनी पालिकेच्या नोटीसला योग्यवेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे म्हटले होते.