शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) दणक्यात झाला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले. यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Shivsena Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला आहे.
"शिवसेनेचा दसरा मेळावा शिमग्यासारखा झाला. उद्धव ठाकरेंनी भाषणात शिव्या द्यायचं काम केलं. बाळासाहेबांच्या मेळाव्यातून विचारांची मेजवानी मिळायची. साहेब बोलायचे तेव्हा लोक एका जागेवरून हालत नव्हते. उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले की लोक बाहेर जातात" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "शिवाजी पार्कचा मेळावा हा तमाशाकारांचा मेळावा... वाकायला पण डॉक्टर लागतो मग काम काय करणार?" असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
"हिंदुत्वाबद्दल तोंड उघडू नये"
"अपघाताने मुख्यमंत्री झालात आणि अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात आलात... मराठी माणसांसाठी काय काम केलं ते एकतरी काम सांगा. बाळासाहेबांच्या विचारामुळे इथे पोहोचलो. तुम्हाला वाकायला पण डॉक्टर लागतो मग काम काय करणार, हिंदुत्वाबद्दल तोंड उघडू नये, बेगडी हिंदुत्व आहे. शिवसेना वाढवण्यात योगदान काय? कोणावर हात उचलला नाही, साहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही" असं देखील नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"