मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार ताशेरे ओढले. यावेळी विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य करत शिवसेनेवरही जोरदार निशाणा साधला. यानंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला. यातच आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज ठाकरे यांची पाठराखण करत शिवसेनेवर टीका केली आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मनसेने भाजपच्या भूमिकेशी सहमती दर्शवणारी भूमिका मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यापासून ते उत्तर प्रदेशमधील विकासाच्या मुद्द्यापर्यंत अनेक बाबींमध्ये घेतल्याचे दिसून आले. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. मात्र, भाजप नेते नारायण राणे यांनी मात्र राज ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.
शिवसेनेची हिंदुत्वाशी मोठी गद्दारी
नारायण राणे यांनी एकामागून एक ट्विट्स केली आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा पंचनामा केला. महाराष्ट्रातील वास्तववादी चित्र त्यांनी सांगितले, हे काही जणांना झोंबले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्या, असे नारायण राणे यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच शिवसेनेने भाजपशी गद्दारी केल्याचा दावा करत, ज्यांनी आयुष्यभर स्वार्थी, सोयीने सत्ता मिळवली त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया द्यावी, हे ही एक आश्चर्य आहे. २०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी गद्दारी केली त्याहीपेक्षा मोठी गद्दारी हिंदुत्वाशी आहे, असे नारायण राणे यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण आहे
तिसऱ्या ट्विटमध्ये नारायण राणे म्हणतात की, पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही उत्तर दिले असले, तरी ‘गद्दारी ती गद्दारीच’. हे निष्ठेचे राजकारण नाही, हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण आहे, या शब्दांत नारायण राणे यांनी टीका केली आहे.